उमेदवारी इच्छुकांच्या पक्षाच्या नेत्यांकडून मुलाखती घेण्याची प्रक्रिया आता जवळपास संपुष्टात आली आहे. काही वेळा स्वतंत्रपणे किंवा सर्व इच्छुकांच्या एकदम मुलाखती घेतल्या जात असत. कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही मदत करू, असे साऱ्या इच्छुकांकडून वदवून घेतले जायचे, पण नंतर जे करायचे ते करायला सारे मोकळे असायचे. आता दिवस बदलले. भाजपमध्ये मतदारसंघांचे सर्वेक्षण करून कोण उमेदवार योग्य असेल, याचा निर्णय घेतला जातो. एका सर्वेक्षणाच्या अहवालावर पक्ष विसंबून राहत नाही तर दोन-तीन संस्थांच्या सर्वेक्षणाच्या अहवालांचे मूल्यमापन केले जाते. कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो याचा आढावा घेऊन मगच संसदीय मंडळासमोर नावे ठेवण्याची औपचारिकता पार पाडली जाते. काँग्रेसमध्येही आता उमेदवार निवडण्याची प्रक्रिया बदलली आहे. २०१४च्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी काही मतदारसंघांतील उमेदवार निवडताना अमेरिकेच्या धर्तीवर प्रायमरीजचा उपयोग केला होता. उलट यातून गटबाजी वाढली. कारण विरोधी गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी उमेदवाराचे कामच केले नव्हते. यामुळेच २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसने ही प्रक्रिया गुंडाळली. यंदा काँग्रेसमध्ये विचारमंथनावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या वाटय़ाला २५ जागा येणार आहेत. पण या जागांवरील उमेदवार निवडण्याकरिता मोठी प्रक्रिया पार पाडण्यात आली. जिल्हा काँग्रेस समित्यांना ठराव करून नावे प्रदेश समितीला पाठविण्यास सांगण्यात आले  होते. मग प्रदेशने ही नावे छाननी समितीकडे पाठविली. छाननी समितीने यावर विचार केला. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे नावे पाठविताना गांभीर्याने पुन्हा एकदा विचारमंथन झाले. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि संघटन सरचिटणीस वेणुगोपाळ यांनी राज्यातील निवडक नेत्यांना दिल्लीत बोलाविले होते. या दोघांनी १० ते १२ निवडक नेत्यांशी संवाद साधला. हा संवाद प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अपरोक्ष साधला. अशोकरावांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या तक्रारी व काही संभाव्य उमेदवारांच्या नावांवरून झालेले आरोप यामुळेच नेतेमंडळींशी विचारमंथनाची प्रक्रिया पार पाडल्याचे बोलले जाते. या साऱ्या विचारमंथनातून उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. यातील निवडून किती येतील हे वेगळेच, पण उमेदवार निवडताना वशिलेबाजी, गटबाजी, पैशांच्या बॅगा नेत्यांकडे पोहचव याला काही प्रमाणात आळा बसला असेल तर ते योग्यच आहे.

मुंबईवाला