प्रदीप नणंदकर

लातूर लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघांत सलग दुसऱ्यांदा मताधिक्य घेत भाजपाने दणक्यात विजय संपादन केल्याने काँग्रेसची पूर्वपुण्याई संपुष्टात आल्याचे मतदारांनी निकालातून दाखवून दिले आहे.

मोदी सरकारच्या नाराजीचा अभूतपूर्व लाभ उठवत काँग्रेस लातूरची जागा जिंकणार, असा दावा पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस आमदार अमित देशमुख यांनी केल्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे गर्दी होती. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लातूरकडे सवतीच्या लेकरासारखे प्रदेश काँग्रेसने पाहिले, देशमुख कुटुंबातील सदस्यांनी अंग झटकून काम केले तरी एकसंघतेचे चित्र निर्माण करण्यात व निवडणूक जिंकण्यासाठी लढली जात आहे, हा विश्वास निर्माण करण्यात अपयश आले. भाजपाने मात्र आयपीएल क्रिकेट सामन्याची तयारी असल्याचे वातावरण केले. नियोजन उत्तम, संघटन, यंत्रणा यातून उमेदवार बदललेला असतानाही त्याचा परिणाम झाला नाही. २०१४ च्या निवडणुकीतही भाजपाला सर्व सहा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले होते. यावेळी त्यापेक्षा ५० हजार मतांचे मताधिक्य मिळाले. हा बदल एका दिवसातला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीत भाजपाने यश मिळवण्यासाठी व्यूहरचना आखली व त्याबरहुकूम काम केले. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सर्वाची मोट बांधून ती एकत्रित ठेवली त्यातून डोळ्यात भरणारे यश मिळाले.

मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सभासदांच्या जीवनात आर्थिक क्रांती केली, बदल घडवला, स्थर्य आणले, तरीही लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळाले नाही, ही चिंताजनक बाब आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत येईल, असा इशारा देणारा  कौल या निवडणुकीत जनतेने दिला आहे. काँग्रेस या निकालाकडे किती गांभीर्याने पाहते यावर काँग्रेसचे भविष्य आहे.