लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ात भाजपला प्रचंड मताधिक्य मिळाल्यामुळे जिल्हय़ातील प्रमुख नेत्यांपासून गावपातळीवरील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल मात्र पुरते खचले आहे.
लोहा, अहमदपूर, उदगीर व निलंगा विधानसभा मतदारसंघांत भाजप उमेदवाराला मिळालेली मते काँग्रेस उमेदवाराच्या जवळपास दुप्पट आहेत. एकूण मतांपकी भाजप उमेदवाराला ६० टक्के, तर काँग्रेस उमेदवाराला ४० टक्क्य़ांपेक्षाही कमी मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसची धूळधाण होणार, याचा अंदाज काँग्रेस कार्यकर्त्यांनाही आला होता. काँग्रेसचे कार्यकत्रे केंद्र व राज्यातील सरकारवर प्रचंड नाराज होते. त्यांचीच कामे होत नसल्यामुळे या सरकारला एकदाचा धडा शिकवला पाहिजे, अशी भाषा त्यांच्या तोंडून येत होती. परंतु जनता इतकी कोपेल व निवडणुकीत प्रकोप घडवून आणेल याचा अंदाज कोणालाही बांधता येत नव्हता. आता निकालानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.
गेल्या काही वर्षांपासून गावातील जनतेच्या छोटय़ा-मोठय़ा प्रश्नांना उत्तरे देण्यात कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत होती. गारपिटीचे अनुदान कधी मिळणार?, गावातील रस्ता दुरुस्त कधी होणार?, महावितरण नवे रोहित्र कधी बसवणार?, गावातील नळयोजना कधी मंजूर होणार?, योजना मंजूर झाली तरी पाणी कुठून व कसे आणणार? अशा एक ना अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत होती. आमदारांना थेट जनतेच्या प्रश्नांना भिडावे लागत नसल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांची अडचणच ते समजून घेत नव्हते, त्याबद्दल कार्यकर्त्यांना ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करावा लागत होता. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालातून गावोगावच्या जनतेने काँग्रेसवर दाखवलेला रोष हा स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी धावून आला आहे. आगामी ४ महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे किमान पुढाऱ्यांची आपल्याशी संवाद साधण्याची भाषा बदलेल, याबद्दल त्यांना आनंद वाटत आहे.