‘संपूर्ण नाशिक जिल्ह्य़ात काँग्रेसची ताकद चांगली असून, अंतर्गत मतभेदही जवळपास संपुष्टात आले आहेत; त्यामुळे नाशिक, दिंडोरी व धुळे या लोकसभेच्या तिन्ही जागांची काँग्रेस पक्षातर्फे मागणी केली जाणार आहे,’ असे वनमंत्री पतंगराव कदम यांनी येथे सांगितले. काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी विरोधातील अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली. गेल्या वेळी जिल्ह्य़ातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते. त्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या आमदारांचे वर्चस्व असून ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या या आढावा बैठकीचा एकूणच नूर राष्ट्रवादीला डराव डराव करण्याचा राहिल्याचे पहावयास मिळाले.
निवडणुका जवळ आल्या की, काँग्रेसची सर्व नेतेमंडळी असे दावे करत असतात. परंतु, वरिष्ठ पातळीवरून सूत्रे फिरली की, त्यांचा हा विरोध मावळून जातो. बैठकीत तशीच सावध भूमिका घेतली गेली. या जागांवर दावा केला जाणार असला तरी पक्ष नेतृत्वाचा निर्णय शिरोधार्य राहील, हे सांगण्यास कदम विसरले नाहीत. नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर व इगतपुरी या ठिकाणी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादीचा एकही आमदार नसताना ही जागा त्या पक्षाला देऊ नये, असा आग्रह स्थानिक नेत्यांनी धरला. आ. जयप्रकाश छाजेड यांनी लोकसभा निवडणूक होऊन जाते, परंतु, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागतो, अशी व्यथा मांडली. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून पैशांचा धो-धो पाऊस पाडला जातो, त्याचे दुष्परिणाम विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवारांना सोसावे लागत असल्याचे छाजेड यांनी सांगत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला लक्ष्य केले. नाशिकची जागा पक्षाला मिळाली किंवा नाही मिळाली तरी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची सर्वाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांनी नाशिकचे पालकमंत्रीपद आणि लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे सोपविल्यास आमुलाग्र बदल घडून कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळेल, असे सांगितले.
जिल्ह्य़ाचे प्रभारी आ. भाई जगताप यांनी, पक्षाच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या मनात मित्र पक्षाविषयी अनेक शंका-कुशंका असल्याचे मान्य करून त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली. लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपात काही जागांवर तडजोड कशी करता येईल, या दृष्टीने या प्रश्नाकडे पहायला हवे. काँग्रेसला मिळणाऱ्या जागांवर अपक्षांच्या नांवाने कोणी बंडखोर लढत असतील तर ते योग्य नाही, असे सांगून त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला.