प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतरही काँग्रेसमधील बंडखोरी कायम

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दौऱ्यानंतरही सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेसमधील बंडखोरी कायम असून यामुळे सांगलीच्या राजकारणातील कदम-दादा गटातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मात्र रविवारी झालेल्या वसंतदादा जन्मशताब्दी सोहळा दादा घराण्यातील प्रतीक-विशाल गटाने हायजॅक केला असल्याने मदन पाटील यांचा गट अस्वस्थ झाला आहे.

विधान परिषद निवडणुकीतील फंद-फितुरी टाळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दादा-कदम गटाची एकत्र बठक घेऊन समेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र या बठकीतच महापालिका राजकारणात कदम गटाचा वाढता हस्तक्षेप होत असल्याची तक्रार करीत आणि महापालिकेतील गरकारभारावर अंकुश ठेवण्यास कदम गट उणा पडत असल्याचा आरोप करीत विशाल पाटील यांनी आक्रमकपणे बाजू मांडली. तोडीस तोड म्हणून डॉ. कदम यांनीही आपण या गटालाही महापालिकेत पदे दिली असल्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकसभा निवडणुकीत काँगेसला मतदान कमी कोणत्या मतदारसंघात झाले याचा जबाब कोण घेणार, असा सवाल करीत दादा गट आक्रमक राहिला. निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र या बठकीत बंडखोरीबाबत फारशी चर्चा झाली नाही. केवळ प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांनी बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही असे सांगत लवकरात लवकर या वादावर तोडगा काढण्याचे आवाहन करीत चर्चा आटोपती घेतली. विधान परिषदेसाठी अपक्ष असलेले शेखर माने हे दादा गटाचे उमेदवार मानले जात असून या गटाची आजही निवडणुकीसाठी प्रचार यंत्रणा राबविली जात असल्याने बंडखोरी कायम ठेवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांच्याकडून उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणतेच आदेश आपणास मिळाले नसल्याचे माने यांनी सोमवारी सांगितले. मतदार सुज्ञ असल्याने पसंतीक्रमानुसार मत देतील असे सांगून आपण अद्यापही डावात असल्याचे संकेत त्यांनी दिले.

  • रविवारच्या वसंतदादा जन्मशताब्दी वर्षांच्या शुभारंभ प्रसंगी दादांचे नातू प्रतीक-विशाल पाटील या दोघांनी राज्यस्तरावरील दिग्गज नेत्यांना आमंत्रित करीत कार्यक्रमातून आपला गट आजही राजकीय पातळीवर दुर्लक्ष करण्यासारखा नसल्याचे प्रदर्शित केले.
  • यातून आगामी विधानसभा निवडणुकीचे बीजारोपण करण्याचा प्रयत्नही झाला. याचबरोबर जिल्हा स्तरावर डॉ. पतंगराव कदम यांच्या गटाला आव्हान कायम असल्याचेही दर्शविण्याचा प्रयत्न झाला.
  • या कार्यक्रमापासून मदन पाटील यांच्या गटाला मात्र बाजूला ठेवण्यात आले होते. महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांच्या गटाला शह देण्याबरोबरच भाऊबंदकीचीही किनार या वेळी जाणवली.