केंद्र सरकार असो किंवा राज्यातील सरकार दोन्हींकडे खोटी आश्वासने दिली जातात. खोटे बोलून सत्ता मिळवण्याची कला नरेंद्र मोदी यांनी हिटलरपासून शिकली आहे. देशातही आता हिटलरशाही सुरु आहे, असा घणाघात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी, लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी येथे कोल्हापूरमध्ये केला. धर्माच्या नावावर दुसऱ्याचे जीव घेण्याचे प्रकार देशात चालणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपा सरकार विरोधात काँग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. कोल्हापुरात शुक्रवारी या संघर्ष यात्रेस सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार सतेज पाटील आदी नेते या यात्रेत सहभागी झाले.

धर्माच्या नावावर दुसऱ्याचे जीव घेण्याचे प्रकार देशात चालणार नाहीत, असा इशारा देऊन खरगे यांनी जातीयवादी संघटनांना संरक्षण देण्याच्या सरकारच्या प्रवृत्तीवर कोरडे ओढले. ते म्हणाले, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात पानसरे, दाभोलकर यांच्यासारख्या समाजसुधारकांचे खून होत असून त्यांचे मारेकरी मोकाट आहेत. पण सरकारी यंत्रणा पुरोगामी विचारांच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना अटक करत आहे. दुसरीकडे, सनातन सारख्या संस्थांना पाठबळ दिले जात आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा हवी की सनातन सारखी याचा विचार करणे गरजेचे आहे. आमची ही मतांची नव्हे तर तत्वाची लढाई असून विखारी प्रवृत्ती विरोधात काँग्रेस लढत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. या फसव्या, जनहितविरोधी सरकारशी दोन हात करणारे जनसंघर्षाचे वारे सुरु झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशात मोदी सरकार आल्यापासून वातावरण कलुषित होत असून विद्यमान सरकार दलित, अल्पसंख्यांक, आदिवासींवर अत्याचार करणा-यांना संरक्षण देत आहे. या घटकांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या अत्याचारी व हुकुमशाही सरकारविरोधात जनमत निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.