30 September 2020

News Flash

जनसंघर्ष यात्रा झाली ‘हवाई यात्रा’

जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा दोन दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून सुरू झाला

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराजबाबा, खग्रे व सातव यांची नांदेडकडे पाठ

नांदेड : महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी सुरू असलेली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा गुरुवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यात दाखल झाली. त्यानंतर शुक्रवारचे भरगच्च कार्यक्रम नियोजनाप्रमाणे पार पाडण्यासाठी या यात्रेला नांदेड जिल्ह्यातून ‘हवाई यात्रे’चे स्वरूप प्राप्त झाले. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लिकार्जुन खग्रे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्ती खासदार राजीव सातव या त्रिकुटाने प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातील कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले.

जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा दोन दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून सुरू झाला. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, लातूर आणि उदगीर या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम-सभा करून ही यात्रा शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास मुखेड येथे दाखल होणार होती; परंतु उदगीरच्या सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह काही नेत्यांची भाषणे खूप लांबल्यामुळे पुढील कार्यक्रमांवर परिणाम झाला, मुखेडमध्ये ही यात्रा सायंकाळी सहानंतर पोहोचली. तेथील सभा संपायला जवळजवळ नऊ वाजल्यामुळे देगलूर येथील सभेला मोठा फटका बसला. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना भाषण करण्यात जेमतेम १०-१५ मिनिटे मिळाली.

गुरुवारच्या कार्यक्रमाची सांगता देगलूरच्या सभेने झाल्यानंतर काँग्रेसचे बहुसंख्य नेते ८० कि.मी. लांब असलेल्या नांदेड येथे मुक्कामी आले. त्यांच्यासाठी शहरातील नामांकित लॉजेसमधील खोल्या आरक्षित करण्यात आलेल्या होत्या, तेथे त्यांनी मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी नरसी येथून यात्रा सुरू झाली. त्यानंतर नायगाव येथे आमदार वसंतराव चव्हाण यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. याचवेळी मल्लिकार्जुन खग्रे आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन नेत्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारूलता टोकस, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी नेते नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रमांमध्ये सहभागी आहेत. नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्यामुळे सर्व नेत्यांना सर्व सभांना हजर राहता यावे, यासाठी प्रदेशाध्यक्षांनी शुक्रवारपासून हेलिकॉप्टरचा वापर सुरू केल्याचे दिसून आले. नायगाव येथील सभा आणि नंतरचे स्नेहभोजन आटोपल्यानंतर काँग्रेसचे काही लोकप्रतिनिधी व पदाधिकारी विशेष बसगाडीतून नांदेड-मुदखेडमाग्रे भोकरकडे रवाना झाले. तर प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व इतर नेत्यांना भोकरमध्ये पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. ही माहिती समजल्यानंतर काँग्रेसच्या दिल्लीतील एका खासदाराने आश्चर्य व्यक्त केले.

या यात्रेचा समारोप १ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे होणार आहे. शनिवारी (दि.२७) नांदेड आणि िहगोली जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रम पार पाडून २८ ऑक्टोबरला विश्रांती घेतली जाणार आहे. त्यादिवशी अशोक चव्हाण यांचा वाढदिवस असल्यामुळे ते नांदेडमध्ये थांबणार असून शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.

२९ ऑक्टोबरपासून यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. पुढच्या टप्प्यातील सभा पार पाडण्यासाठी पुन्हा हेलिकॉप्टरचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. जनसंघर्ष यात्रेच्या प्रसिद्धी व वातावरण निर्मितीसाठी पक्षाने भरपूर खर्च केल्याचे दिसत आहे. मराठवाडय़ातील अन्य जिल्ह्यंच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यातील खर्चाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत पूर्वी नायगाव मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’कडे होता. २०१४ साली आघाडी तुटल्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. त्यात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून आले. असे असले तरी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी नायगाव मतदारसंघावर दावा ठोकला आहे; पण संघर्षयात्रेदरम्यान शुक्रवारी दुपारी नायगावमध्ये झालेल्या सभेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नांदेड जिल्ह्यातील नऊ जागांची सात आणि दोन अशी विभागणी करून नायगाव काँग्रेसकडेच राहील, असे स्पष्ट केले. काँग्रेस नेत्यांनी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या आयोजनाला दाद देत त्यांना पुढील आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या.

विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नांदेड जिल्ह्यात बहुसंख्य तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती असताना काही तालुक्यांतच दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर करण्यात आल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सर्वत्र दुष्काळसदृश्य स्थिती असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र अदृश्य असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:44 am

Web Title: congress jan sanghsh yatra in nanded district
Next Stories
1 सिंचन घोटाळ्याशी संबंध नाही : अजित पवार  यांचे स्पष्टीकरण
2 सीबीआय संचालकांना हटविण्याचा निर्णय हुकूमशाहीचा – सुशीलकुमार शिंदे
3 अरबी समुद्रात नाही सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक बांधा-नितेश राणे
Just Now!
X