लोकसत्ता वृत्तवेध

संतोष प्रधान, मुंबई</strong>

उत्तर प्रदेशपाठोपाठ कर्नाटकातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात समविचारी पक्ष एकत्र आल्याने त्याचा विरोधकांना फायदा झाला. लोकसभा निवडणुकीत हाच प्रयोग विविध राज्यांमध्ये राबविला गेल्यास भाजपसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो.

कर्नाटकातील पाच मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीने चार जागा जिंकून भाजपला मोठा झटका दिला. याआधी उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभेच्या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पार्टी, बसपा आणि राष्ट्रीय लोकदल एकत्र आल्याने भाजपचा दारुण पराभव झाला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिनिधित्व केलेल्या गोरखपूर मतदारसंघात समाजवादी पार्टी-बसपा आघाडीचा विजय झाला होता. गेल्या मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल एकत्र आल्याने भाजपला सत्ता संपादन करता आली नव्हती. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडीचे रडत खडत का होईना गेले सहा महिने सरकार टिकून आहे. महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्याने भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता.

भाजपच्या विरोधात समविचारी पक्ष एकत्र आल्यास भाजपला यश मिळत नाही, हा कल लक्षात घेऊनच भाजपविरोधातील समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला असला तरी अन्य पक्षांनी त्याला तेवढा प्रतिसाद दिलेला नाही. ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू यांनीही त्यासाठी भर दिला आहे. राज्याराज्यांमध्ये आघाडीसाठी चर्चा व्हावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

महाआघाडीसाठी प्रयत्न सुरू असतानाच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये मायावती यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली. पण मायावती या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत येतील, असा विश्वास व्यक्त केला जातो.

पाच राज्यांच्या निकालानंतर राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळाल्यास विरोधकांच्या एकीला बळ मिळू शकेल. विरोधक एकत्र येणे हे भाजपसाठी निश्चितच तापदायक ठरणारे आहे. कारण विरोधकांच्या मतांचे विभाजन झाल्याशिवाय भाजपला यश मिळत नाही.

 

भाजपचे विरोधक एकत्र आल्यास त्याचा फायदा होतो हे पोटनिवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाले. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची ही सुरुवात आहे.

रणदिपसिंग सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते