सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ७५ टक्के यश मिळविले आहे. शिवाय राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा व मनसे पक्षानेही आपले अस्तित्व राखले आहे.सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यात काँग्रेसने ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत मिळविले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सक्षमपणे उभे राहून आपली ताकद दाखविली आहे.
जिल्ह्य़ात ३२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. काही ग्रामपंचायती बिनविरोध होऊन अन्यत्र सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी काँग्रेसने जोरदार आघाडी उघडली होती. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा व मनसे प्रचारात आर्थिक स्तरावर दुर्बळ ठरले. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी फटका बसला.
काँग्रेसने केलेल्या शक्तीप्रदर्शनात जिल्ह्य़ातील काही तालुक्यात काँग्रेस नेतृत्वाला विचार करावा लागेल, असे संकेत मतदानाच्या आकडेवारीतून मिळत आहेत.काँग्रेस पक्षाने ९० टक्के ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाल्याचा दावा केला आहे. शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीने काही तालुक्यात काँग्रेसला दणका दिल्याचे उघड झाले.
गाव पॅनेल विजयी करून गावात विकासाचा चेहरा आणणाऱ्या अनेक ग्रामपंचायती आपल्या नेतृत्वाखाली आल्या असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.