News Flash

राऊतांनी लिहिलेला अग्रलेख अपूर्ण माहितीच्या आधारावर; थोरातांचं प्रत्युत्तर

आमची भेट झाल्यांतर वस्तूस्थिती दिसेल, थोरातांनी व्यक्त केलं मत

राऊतांनी लिहिलेला अग्रलेख अपूर्ण माहितीच्या आधारावर; थोरातांचं प्रत्युत्तर

“काही विषय असले तर बोलले पाहिजेत, तसंच काही व्यथा असल्या तर त्यादेखील मांडल्या पाहिजेत. आघाडीचे आणि राज्याचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते ऐकून घेतलं पाहिजे. मला खात्री आहे की आमचं म्हणणं ऐकल्यानंतर ते समाधानी होतील,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. तसंच सामनाचा अग्रलेख हा अपूर्ण माहितीच्या आधारावर लिहिला आहे, असं प्रत्युत्तरही त्यांनी यावेळी दिलं.

ज्या प्रमाणे विधानसभेत सर्व पक्षांना जागा मिळाल्या त्याच प्रमाणे मंत्रिपदांचं वाटप करण्यात आलं आहे. तो वादाचा विषय़ नाही. राज्याच्या हिताच्या दृष्टीनं काही विषय महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टीनं आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं. “अपूर्ण माहितीच्या आधारावर सामनातील अग्रलेख लिहिण्यात आला आहे. आमची भेट झाल्यानंतर त्यांना वस्तूस्थिती दिसेल आणि त्यानंतर पुन्हा ते एक चांगला अग्रलेख लिहितील,” असंही त्यांनी नमूद केलं. “सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. त्यांनी योग्य माहिती घेऊच लिखाण करावं ही अपेक्षा आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- काँग्रेस-शिवसेनेअंतर्गत कुरबुरी? संजय राऊत म्हणतात; …तर अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी

काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी चुकीचं वक्तव्य केलं नाही हे सर्वांना माहितच आहे. आमची जनतेसाठी काही मागणी आहे. त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्र्यांशी समोरासमोर चर्चा करायची असल्याचं थोरात म्हणाले. “शरद पवार हे केवळ राष्ट्रवादीचेच नेते आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे. ते आमच्या आघाडीचेही नेते आहेत. जेव्हा ते कोणाची भेट घेत असतील ते सर्वांसाठीच घेत असतील. जेव्हा गरज असते तेव्हा ते आमच्यासोबतही चर्चा करतात, “असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- जुनी खाट का कुरकुरतेय?; शिवसेनेची काँग्रेसवर टीका

काय म्हटलं होतं अग्रलेखात?

उद्धव ठाकरे सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री झाले, तेव्हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले गेले. त्याही स्थितीत काही पोटदुख्या लोकांनी असा पेच टाकला होता की, हे राज्य महिनाभर तरी टिकेल काय? मात्र तसे काही घडले नाही. घडण्याची शक्यताही नाही. सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही.

काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणेही तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. ‘मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू,’ असे थोरातांनी सांगितले. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’ला एक जोरदार मुलाखत दिली व तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले की, ‘‘सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये जरा आमचेही ऐका. प्रशासनातील अधिकारी म्हणजे नोकरशाही वाद निर्माण करीत आहे. आम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशीच बोलू!’’

मुख्यमंत्री त्यांचे म्हणणे ऐकतील व निर्णय घेतील, पण काँग्रेसचे नेमके म्हणणे काय आहे? राजकारणातील ही जुनी खाट महाराष्ट्रात कुरकुरू का लागली आहे? आमचे ऐका म्हणजे काय? यावरही आता झोत पडला आहे. थोरात व चव्हाण हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत व त्यांना सरकार चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, असा दांडगा अनुभव शरद पवार व त्यांच्या पक्षाच्या लोकांपाशीही आहे. तथापि कुरकुर व कुरबुर होताना दिसत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 12:30 pm

Web Title: congress leader balasaheb thorat answers shiv sena leader sanjay raut saamna editorial criticizing congress jud 87
Next Stories
1 काँग्रेस-शिवसेनेअंतर्गत कुरबुरी? संजय राऊत म्हणतात; …तर अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी
2 जुनी खाट का कुरकुरतेय?; शिवसेनेची काँग्रेसवर टीका
3 आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेध घेणार शैलेंद्र देवळाणकर, लोकसत्ता डिजिटल अड्डावर
Just Now!
X