27 February 2021

News Flash

“योगी आदित्यनाथ सरकारकडून हाथरस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप

फाइल फोटो (फोटो सौजन्य: पीटीआय)

योगी आदित्यनाथ सरकारकडून हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. तसंच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी सत्याग्रह केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. हाथरसच्या पीडित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून त्याच मागणीसाठी आज राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या सत्याग्रहात भाग घेतला.
मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, आ. अमिन पटेल, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, यशवंत हाप्पे, भाईजान, सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद, नितीन पाटील, मुनाफ हकिम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की “उत्तर प्रदेशातील घटना अमानवीय असून  योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. दलित समाजातील मुलगी आणि त्या कुटुंबीयांवर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि प्रियांका गांधी करत असताना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली ते अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. हाथरसचे प्रकरण दाबण्यासाठी भाजपाचे स्थानिक नेते व माजी आमदार आरोपींच्या समर्थनार्थ बैठका घेत आहेत. पोलीस बळाचा वापर करुन पीडित कुटुंबाला समाजापासून वेगळे पाडण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी हे प्रकरण अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. आताही त्यांनी विरोधकांना दंगली घडवायच्या आहेत असा हास्यास्पद आरोप करुन मूळ घटनेवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला आहे.”

भाजपाच्या राज्यांत दलित, अल्पसंख्याक, महिला यांच्यावर अत्याचार वाढले असून त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही त्यामुळे हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुप्रीम कोर्टामार्फत करावी आणि हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करावी या काँग्रेसच्या मागण्या आहेत. काँग्रेस त्या पीडितेला व तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संघर्ष करत असून हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरुच राहिल असेही थोरात म्हणाले.

पुणे येथे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला तर अमरावती येथे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नांदेड, कोल्हापूर, नाशिक, नागपूर ,बुलढाणा, यवतमाळ, सिधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, परभणी, भिवंडी अकोला यासह राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांत सत्याग्रह आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 11:43 pm

Web Title: congress leader balasaheb thorat reaction on hathras case and yogi government scj 81
Next Stories
1 Good News! महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण ११ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज
2 वर्धा : करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबास ५० लाखांचा धनादेश
3 ….तर समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडणार – आमदार भोयर
Just Now!
X