मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विठ्ठलाचे भक्त असते, तर ते आषाढी पूजेसाठी पंढरपूरला गेले असते, असे सांगत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या विठ्ठल भक्तीवरच प्रश्न उपस्थित केले.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘आषाढी एकादशीला गेल्या २७ वर्षांपासून मी विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहे. आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा मराठा समाज आणि धनगर समाजाच्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यानी पूजेला जाणे टाळले आहे. या समाजाच्या रोषाला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार असून त्यांनी एका महिन्यात आरक्षण देतो असे सांगितले होते. त्याचे काय झाले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विठ्ठलाचे भक्त असते, तर ते आषाढी पूजेसाठी पंढरपूरला गेले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.