काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे मत

सुमारे ४० वर्षांच्या राजकारणानंतर आपण करत असलेली नर्मदा परिक्रमा यात्रा आत्मचिंतनाची उत्तम संधी आहे, असे मत गुजरातच्या निवडणुकांमुळे देशाचे राजकारण तापले असतांनाही त्यापासून अलिप्त राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केले.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग सुमारे दोन महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्त राहत सपत्नीक नर्मदा परिक्रमा करीत आहेत. २०० सहकाऱ्यांसह सिंग यांनी परिक्रमा सुरु केली असून ५१ व्या दिवशी म्हणजेच मंगळवारी त्यांची परिक्रमा यात्रा महाराष्टातून गुजरातमध्ये दाखल झाली. त्याआधी नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर या गावात त्यांनी परिक्रमा, आदिवासी भागाचा विकास याविषयी आपली भूमिका मांडली. १२ नोव्हेंबर रोजी त्यांची यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर नर्मदा काठावरील परिक्रमेच्या खडतर मार्गावरुन ते पायी जात आहेत. एकूण तीन हजार ८०० किलोमीटरपैकी ९०० पेक्षा अधिक किलो मीटरचे अंतर सिंग यांनी पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील १६० किलोमीटरच्या प्रवासात त्यांनी आदिवासी संस्कृती समजावून घेतली. आदिवासीबहुल भागात वन विभागाने रोजगार निर्मिती करण्याची गरज त्यांनी मांडली. महाराष्ट शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या शाळांमधून आदिवासींना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करत इंग्रजीसारख्या भाषेतही आदिवासी विद्यार्थ्यांना तरबेज करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सरदार सरोवरामुळे पूर्वीच्या नर्मदा परिक्रमेचा मार्ग बदलला असला तरी हा मार्ग अद्यापही तीन राज्यांच्या आदिवासीबहुल भागातून जात असल्याने या भागाचा अभ्यास करण्याची ही चांगली संधी लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

बासवाडापासून ते झारखंडपर्यंतच्या आदिवासी भागाच्या सर्वागीण विकासासाठी उत्तर-पूर्वेतील राज्यांप्रमाणे सहावी अनुसूची लागु करण्याची मागणी सिंग यांनी केली. नर्मदा धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासींचे मध्यप्रदेशपेक्षाही महाराष्ट्रात चांगले पुनर्वसन झाले असून याचे सर्व श्रेय लढवय्या मेधा पाटकर यांच्यासारख्या सामाजिक कार्यकत्यरंना जाते. वनहक्क कायद्याची प्रभावी अमलबजावणी ही मोठी समस्या असून यावर लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

परिक्रमेदरम्यान कोणतेही राजकीय वक्तव्य न करता आदिवासींच्या समस्या जाणून घेणाऱ्या सिंग यांच्यातील या परिवर्तनाने सर्वच जण चकीत होत आहेत. आपण नर्मदा परिक्रमेसाठी सोनिया गांधी यांच्याकडून सहा महिन्यांसाठी राजकीय विरामाची परवानगी मागितली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या खांद्याला खांदा लावून पायी चालणाऱ्या पत्नी अमृताच्या हिंमतीचीही त्यांनी दाद दिली.