“जागतिक आरोग्य संघटनेनं करोना ही महामारी आहे हे घोषित केल्यानंतर काही दिवसांनी आपण देशात लॉकडाउन जाहीर केला. यादरम्यान देशात विमानांचं उड्डाण सुरू होतं. दुर्दैवानं मुंबईचं विमानतळही सुरू ठेवण्यात आलं होतं. मुंबईत विमानानं दररोज १६ हजार लोक येत होते. म्हणजेच लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी किती प्रवासी आले असावेत? त्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याऐवजी होम क्वारंटाइन करण्यात आलं. मात्र त्यांनी करोनाचा प्रसार अधिक केला,” असं मत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबईतील धारावी ही जगातील सर्वात जास्त घनता असलेली वस्ती आहे. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच पालन करणं शक्य नाही. त्या ठिकाणी केवळ लोकांची चाचणी करणं हाच एक उपाय आहे. राज्य सरकार कोणत्याही राज्यापेक्षा अधिक चाचणी करत आहे. टेस्टिंग किट्ससाठीही केंद्र सरकारकडून मदत मिळत नाही. तरीही आम्ही सर्वाधिक चाचण्या करत आहोत आणि त्यामुळेच रुग्णांची सर्वाधिक संख्या सापडत असल्याचं चव्हाण म्हणाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. “इतर कोणत्याही शहरापेक्षा मुंबईत आरोग्य व्यवस्था उत्तम आहे. राज्य सरकार ज्या परिस्थितीत या सर्वांना सामोरं जात आहे निश्चितच ते चांगलं काम करत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे सुरू कराव्यात

“रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आतापर्यंत किती ट्रेन पाठवल्या हे सांगण्यापेक्षा सर्व रेल्वेगाड्या सुरू कराव्यात. रेल्वेगाड्या भरतील किंवा “नाही परंतु करोना संकटापूर्वी जेवढ्या प्रमाणात रेल्वेगाड्या जात होत्या तेवढ्या त्यांनी सोडाव्यात. तसंच केंद्रीय मंत्र्याला एकमेकांवर आरोप करणं शोभत नाही. पंतप्रधानांना आपल्या मंत्र्यांवर अंकुश ठेवता येत नाही का?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.