चिपळूणमधील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि काही महिन्यांपूर्वीपर्यंत नारायण राणे यांचे समर्थक म्हणून समजले जाणारे संदीप सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला आणि राणेंना धक्का बसला आहे. संदीप सावंत यांनी शनिवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमध्ये कामे करताना अडचणींमुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी संदीप सावंत यांना मारहाण केल्यामुळे राणे आणि सावंत यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष फारसा प्रभावी नाही. यापूर्वी राणे यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम शिवसेनेत परतले होते. त्यांच्यानंतर आता संदीप सावंत यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यामुळे काँग्रेसची अवस्था अधिकच दयनीय होण्याची शक्यता आहे. राणे यांचे नेतृत्व मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा संच जिल्ह्यात उरलेला नाही. राणे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात असून आज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे यांनी रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. राणे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना दुसरीकडे संदीप सावंत यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश राणेंना धक्का देणारा आहे.