ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून काँग्रेसने भाजपावर टीकेची झोड उठवली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच ओबीसीचं राजकीय आरक्षण जाण्यासाठी भाजपा जबाबदार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर त्यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची जुनी क्लिप दाखवत चिमटा काढला.

“देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलण्याची मशिन आहे. खोटं बोला रेटून बोला. त्यांची ती परंपरा आहे. धनगर समाजाचा प्रश्न असो, मराठा समाजाचा प्रश्न असो. पाच वर्षे त्यांनी खोटेपणा केला. नौटंकी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेला कळलेला आहे. चार महिन्यात मी आरक्षण मिळवून देतो, असं म्हणणाऱ्या फडणवीसांनीच ओबीसींचं आरक्षण काढलं आहे. त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही.”, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

सर्व चाव्या फडणवीसांकडे, तर मग पाठीत खंजीर का खुपसला?; राऊतांना भाजपाचा सवाल

“राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये, अशी आमची सर्वांची भूमिका आहे. राज्य सरकार स्वत: सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. या निवडणुका सर्व रद्द कराव्यात. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून डाटा मागवून ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण कायम ठेवावं, ही मागणी केलेली आहे. केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे ओबीसी समाजाचं घात झाला आहे. त्यामुळे भाजपा हे उघड्यावर पडलेलं आहे. जिथपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे जातील.”, असंही त्यांनी सांगितलं. “पंकजा मुंडे यांच्याकडेच ग्रामविकास खातं होतं. त्यांच्याच खात्यानं २०१७ साली हे पत्रक काढलं होतं. त्यांचं खातं कोण चालवत होतं. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची खाती नागपूरच्या रेशीमबागेतून आलेली लोकं चालवायची. प्रत्येक विभागात त्यांचे लोकं होते. पंकजा मुंडेकडेही असाच एखादा माणूस असेल. खातं हे चालवत नव्हते. हे फक्त चेहरे होते. त्यांचं खातं चालवणारे दुसरे होते.”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

…म्हणून ठाकरे सरकारकडून सामाजिक आणीबाणी; नव्या निर्बंधावरून भाजपाचा संताप

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं एकमत आहे. विधानसभा अध्यक्षाची निवड या अधिवेशनात होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष बळकट करण्याचा अधिकार आहे. स्वबळाचा नारा देण्याचा अधिकार आहे, असंही एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.