शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळाच्या घोषणेवरुन काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी कुणाला उद्देशून भाषण केलं आहे, हे स्पष्ट नाही असं त्यांनी सांगितलं आहे. प्रत्येक पक्षाला स्वबळाचं स्वातंत्र्य आहे असंही ते सांगायला विसरले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे.

“लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात कुणाला बोलले हे स्पष्ट नाही. भाजपानंही परवा स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे त्यांनी नेमकं कुणाला बोललं याबाबत स्पष्टता नाही. त्यांच्या वर्धापन दिनाला आम्ही काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते या भाषणात शिवसेनेचे प्रमुख म्हणून बोलत होते. ही त्यांची स्टाईल आहे. ते नेमकं कुणाला बोलले हे स्पष्ट नाही”, अशी सावध प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

“घरातून करतोय तर एवढं काम होतंय, बाहेर पडलो तर….!” विरोधकांना उद्धव ठाकरेंचा खोचक टोला!

“जे अनेक राजकीय पक्ष करोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना मला सांगायचंय की स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतंच नसतं. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागतं. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल, तर वार कसा करणार?” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, “लोक अस्वस्थ असताना स्वबळाचे नारे दिलेत, तर लोक जोड्याने मारतील”, असं देखील उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसला टोला हाणला होता.

“मनगटात ताकद नसती तर काहीच होऊ शकलं नसतं”, शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा ऑनलाईन संवाद

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील मुंबईत बोलताना स्वबळाची मागणी केली. आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची परवानगी द्या, मग बघा, असा इशाराच त्यांनी दिला आहे. “काल-परवापर्यंत काँग्रेसचा कॉग्निझन्स लोक घेत नव्हते. आज फक्त काँग्रेस काय करतेय हे बघत आहेत. मग ते मुंबई असो वा महाराष्ट्र असो. माझी तुमच्याकडे विनंती आहे. राहुल गांधींना विनंती आहे. सोनिया गांधींना विनंती आहे. आम्हाला एकटं (स्वबळावर) लढू द्या. तेव्हा बघुयात किस मे है कितना दम”, असं भाई जगताप म्हणाले.