चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशेष वेळ काढून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित बैठकीत ओबीसींच्या विविध विषयावर मंगळवारी सविस्तर चर्चा केली. यावेळी ओबीसींना राजकीय आरक्षण व पदोन्नतीमधील आरक्षण न मिळण्याचे महापाप भाजपचे असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. याअगोदर केंद्र व राज्यात सत्ता असताना भाजपने ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे केंद्राच्या अखत्यारित असूनही केंद्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे व महासचिव सचिन राजूरकर यांच्या हस्ते आमदार पटोले यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, इतर मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करा व ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याबाबत निवेदन दिले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्यांकडे लक्ष वेधून प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.