अकोला : करोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप लाखो जनतेचा बळी गेला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला.

बुलढाणा जिल्ह्यच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोन्द्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषा पवार आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. नाना पटोले यांनी विविध मुद्दय़ांवरून भाजप व केंद्र सरकारवर शरसंधान साधले.

नाना पटोले पुढे म्हणाले, करोनाची दुसरी लाट येणार असल्याचा इशारा ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. विविध राज्यातील निवडणुका असल्याने त्या घेण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यामध्ये देश करोना मुक्त झाल्याचे सांगितले आणि मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण देशात कोविडने हातपाय पसरायला सुरुवात केली. वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर देशामध्ये करोनाचा उद्रेक झाला नसता. मात्र, नरेंद्र मोदी केवळ प्रधानमंत्री नसून ते प्रचारजीवी आहेत. त्यांना करोनाच्या परिस्थितीत प्रचार करता आला नसता. त्यामुळे देशातील जनतेला अंधारात ठेवले. केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे असंख्य निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. या सर्व प्रकारावर देशातील विविध न्यायालयांनी देखील ताशेरे ओढले आहेत.

ओबीसीचे राजकीय आरक्षण जाण्यासाठी भाजप जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याने संपूर्ण देशातील ओबीसींना त्याचा फटका बसणार आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी ओबीसींचे नुकसान करण्याचे पाप भाजपने ठरवून केले आहे, असा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस व राज्यातील भाजप पदाधिकारी कधी मराठा आरक्षण, कधी एससी-एसटी तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करतात. राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत राज्य सरकार आज पडणार, उद्या पडणार असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

प्रदेशाध्यक्षांकडून जिल्हा काँग्रेसचा आढावा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलढाणा जिल्हय़ाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात विविध ठिकाणी भेटी देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेऊन त्यांनी जिल्हय़ातील करोना परिस्थिती जाणून घेतली. बुलढाणा येथील काँग्रेस भवनमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्ष कार्याचा आढावा घेतला. यावेळी पक्षातील गटबाजीचा मुद्दा चव्हाटय़ावर आला. त्यावर नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करून पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.