अशोक चव्हाण, मोहन प्रकाश राज्यात काँग्रेस संपवत असून त्यांनी मी काय आहे हे अजून समजलेच नाही. मला डिवचले की माझी ताकद दुप्पट होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार, असे काँग्रेस नेते नारायण राणे  यांनी सोमवारी सांगितले. मी खूप पुढे आलोय, फक्त आता तुम्ही साथ सोडू नका असे भावनिक आवाहन त्यांनी समर्थकांना केले.

भाजपच्या वाटेवर असलेले माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे कुडाळमध्ये पोहोचले. राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सदस्यांचा स्वतंत्र गट म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केल्याचे समोर आले होते. यानंतर काँग्रेसने शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केली होती. सोमवारी नारायण राणेंनी काँग्रेसच्या या निर्णयावर चौफेर टीका केली. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करण्याचा निर्णय नियमबाह्य असून माझ्या संमतीशिवाय प्रदेश काँग्रेस निर्णय घेऊ शकत नाही असे राणेंनी म्हटले आहे. नारायण राणे नाराज असल्याच्या बातम्या येत असतानाही काँग्रेसचा एकही नेता माझ्याशी बोलला नाही. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करताना कोणीच विचारलं नाही असा दावा त्यांनी केला.  राज्यात काँग्रेसचे सर्वात चांगलं काम सिंधुदुर्गमध्ये असून नांदेडमध्येही अशी स्थिती नसल्याचे ते म्हणालेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमचं पॅनल उतरवणार असून समर्थ विकास पॅनल निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर कार्यकर्त्यांनी ‘नारायण राणे आगे बढो’ अशा घोषणा दिल्या. यावर राणे म्हणाले, ‘मी खूप पुढे आलोयं. फक्त आता तुम्ही साथ सोडू नका’. ३१ जिल्ह्यांचे लोक मी काय बोलतोय याची वाट बघतायंत असेही त्यांनी सांगितले.

नारायण राणेंपूर्वी नितेश राणेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. हुसेन दलवाई की हलवाई आहे हे माहित नाही असे चिमटा काढत नितेश राणे म्हणाले, विकास सावंत, हुसेन दलवाई यांची आमच्यासमोर बोलण्याची हिंमत नाही. संपूर्ण महाराष्ट्र नारायण राणेंना ओळखतो. अशा नेत्याच्या मागे उभे राहावे असे आवाहन निलेश राणे यांनी केले. विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी करणार नाही असा निर्धार निलेश राणेंनी केला.

नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सदस्यांचा स्वतंत्र गट म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केल्याचे समोर येताच काँग्रेसने शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केली होती. राणे यांनी पक्षांतर केल्यास हा गट त्यांच्याबरोबर जाऊ शकत होता. पण ही बाब काँग्रेसच्या वेळीच लक्षात आली आणि काँग्रेसने राणेंना धक्का दिला होता. सोमवारी कुडाळमध्ये राणेंनी शक्तिप्रदर्शन केले.