शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला धूळ चारली आहे. एकूण १७ जागा असलेल्या या नगरपंचायतीमध्ये ९ जागांवर नारायण राणेंच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसने विजय मिळवत सत्ता काबीज केली. दुसरीकडे शिवसेनेला अवघ्या ६ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. भाजपने १ जागा मिळवत या निवडणुकीत पक्षाचे खाते उघडले.
मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यावेळी कुडाळ शहरामध्ये वैभव नाईक यांना चांगली आघाडी मिळाली होती. त्यामुळे पहिल्यांदाच होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकीत काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर मतदारांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांच्याच बाजूने कौल दिला असून, काँग्रेसकडे सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला लढण्यासाठी केवळ दोनच जागा दिल्या होत्या. त्या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. शिवसेना आणि भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढविली होती.
कुडाळ शहर हे राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे शहर मानले जाते. त्यामुळे आजी-माजी आमदारांनी नव्याने स्थापन झालेल्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली. या नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी ७७ उमेदवार रिंगणात होते. कुडाळ नगर पंचायतीसाठी ७३.६३ टक्के मतदान झाले होते.

पक्षीय बलाबल
एकूण जागा – १७
काँग्रेस – ९
शिवसेना – ६
भाजप – १
अपक्ष – १