काँग्रेस नेत्याच्या आरोपामुळे राष्ट्रवादी संतप्त

मुंबई : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यापाठोपाठ हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळेच काँग्रेस सोडावी लागल्याचा आरोप महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतप्त झाले असून, अशी टीका करण्यापूर्वी स्वपक्षाच्या  प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीने दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडमुठेपणामुळेच काँग्रेसचे नुकसान होत असल्याचेही छाजेड यांनी पत्रकात नमूद केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगरची जादा सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादीने सोडली असती तर कदाचित राज्यातील  चित्र वेगळे राहिले असते. राष्ट्रवादीने तेव्हा हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करून स्वत:कडे  ठेवला; पण मतदारांनी राष्ट्रवादीला नाकारले आणि  सुजय विखे निवडून आले. इंदापूरची जागा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यास राष्ट्रवादीने आता नकार दिला. वास्तविक लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळावे म्हणून इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनीच मेहनत घेतली होती. तरीही राष्ट्रवादीने जागा सोडण्यास नकार दिला. परिणामी येत्या दोन-चार दिवसांमध्ये हर्षवर्धन पाटील हेसुद्धा काँग्रेस सोडून अन्य पक्षात प्रवेश करणार आहेत. तसे सूतोवाच त्यांनी केल्याकडे छाजेड यांनी लक्ष वेधले. हर्षवर्धन पाटील यांना पक्षनेतृत्व न्याय देऊ शकले नाही, अशी खंतही पत्रकात व्यक्त करण्यात आली.

आरोप फेटाळले

विखे-पाटील किंवा हर्षवर्धन पाटील यावरून राष्ट्रवादीवर टीका करण्यापूर्वी छाजेड यांनी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिले आहे. इंदापूरच्या जागेवरून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दीड वर्षांपूर्वी विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली तेव्हाच हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होती की नाही याबाबत पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांना विचारावे, असेही काकडे यांनी छाजेड यांना सुनावले आहे.