News Flash

बोटं मोडून काही सरकार बदलत नाही : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही, चव्हाण यांचं वक्तव्य

संग्रहित छायाचित्र

“पाच वर्षाच्या त्यांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली होती म्हणून आम्ही हे सरकार स्थापन केलं आहे. चांगलं काम करणारे हे भक्कम सरकार आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही,” असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुणे पदवीधर व शिक्षक विधान परिषद महाविकास आघाडीचे पदवीधरचे उमदेवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण वाई येथे आले होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, डी एम बावळेकर, बाबुराव शिंदे, विराज शिंदे आदी उपस्थित होते.

“अर्णब गोस्वामी अथवा कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत न्यायालयाने सरकारला कोणताही दोष दिलेला नाही. या निकालाचा अभ्यास सुरू आहे आणि जर काहीही चुकीचे वाटले तर त्याबाबत अपील करता येईल. न्यायालयाने या खटल्यात दिलेल्या निवाड्याबाबत आम्ही काही बोलणार नाही. मात्र अत्यंत महत्त्वाची प्रकरणे सुनावणीला येणे गरजेचे असताना व पस्तीस हजारांपेक्षा जास्त महत्त्वाचे खटले सुनावणीसाठी प्रलंबित असताना न्यायालयाने राजकीय दृष्ट्या सोयीचे खटले सुनावणीला घेतले. त्याला आमची हरकत आहे,” असंही चव्हाण म्हणाले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक महत्त्वाचे खटले प्रलंबित आहेत. पण हे खटले पुढे सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाकडे वेळच नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

“याचा अर्थ सध्या देशात लोकशाही अस्तित्वातच नाही. लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकारने व नरेंद्र मोदींनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यांच्या दबावाखाली काही काम होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लोकांना घटनेत अभिप्रेत असणारा न्याय मिळणार की नाही अशी शंका लोकांमध्ये निर्माण होत आहे,” असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. या सरकारने वर्षभरात चांगलं काम केलं आहे. सरकारनं कोविडवर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवलं आहे. करोनाचे मोठे संकट असताना ही अनेक निर्णय, शेतकरी कर्ज, अवकाळी पाऊस, आदी अनेक विषय थांबलेले नाहीत. विरोधक केवळ द्वेषातून आणि विद्वेगातून आरोप करत आहेत आणि हे आरोप कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचंही चव्हाण म्हणाले. “महाविकास आघाडीचे सरकार हे भक्कम व चांगले चालणारे सरकार आहे आणि हे पाच वर्षे पूर्ण करेल. चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांमध्ये चाललेली जुगलबंदी एक करमणूक आहे यापेक्षा त्याला महत्त्व नाही. मागच्या सरकारने राज्यात कोणताही मोठा प्रकल्प उभारला नाही. शेतकरी आत्महत्या याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. महाराष्ट्र व्यापार सर्वेक्षण मूल्यांकनातं घसरून सहा क्रमांकावरून तेरा क्रमांकावर घसरल्यामुळे उद्योगधंदे बाहेर जायला लागले होते. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी राहणार की नाही असा प्रश्न निर्माण होऊन हे स्थान दिल्लीकडे सरकायला लागलेले होते. पुन्हा जर हे सरकार राज्यात आले असते तर महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहिला नसता. म्हणून आम्हाला हे सरकार स्थापन करावे लागले असे सांगून चव्हाण म्हणाले सरकारचे मूल्यमापन करायला राज्यातील जनता समर्थ आहे,” असंही म्हटलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 8:51 pm

Web Title: congress leader prithviraj chavan criticize bjp opposition on criticizing government on various issues jud 87
Next Stories
1 महाराष्ट्रात मागील २४ तासात ५ हजारांपेक्षा जास्त करोना पॉझिटिव्ह रुग्ण
2 मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा टोला
3 “थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…” भाजपा नेत्याचा सरकारला उपरोधिक टोला
Just Now!
X