दहशतीसाठी ईडी सारख्या केंदीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. खरच चूक असेल तर कारवाई करा. परंतु विरोधकांना लक्ष्य करत विरोधी पक्षाला मोडण्याकरता केंद्रीय नेतृत्व कारवाई करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात केला. महाविकास आघाडीचे पदवीधर विधानपरिषद मतदार संघातील उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ मेळाव्यानंतर चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते.

बिहारमधील निवडणूक अटीतटीची झाली. ही सकारात्मक बाब आहे. भाजप नेहमी ध्रुवीकरणाचे राजकारण करते. लव जिहाद कायदा आणून त्यांना देशाचे पुन्हा विभाजन करायचे आहे. अशा कायद्यांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन विभाजन होण्याची भीती चव्हाण यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा- “आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, अटक करायची असेल तर…,” संजय राऊतांचं जाहीर आव्हान

“विरोधी पक्षांना मोडून काढण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे. मलादेखील काही दिवसांपूर्वी आयकर विभागाची नोटीस आली. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनादेखील ईडीने नोटीसा पाठवल्या. नोटीसा व केंद्रीय यंत्रणांचा वापर करत भाजपा आकड्यांचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,” असं ते म्हणाले. विरोधी नेत्यांना, विरोधी पक्षांच्या प्रमुखांना टार्गेट करत भाजपा या संस्थांचा गैरवापर करत आहे. खरच चूक असेल तर कारवाई व्हावी, खटले भरा. यापूर्वी राज्यात अशा प्रकारे अनेक नेत्यांना लक्ष्य करत तुरुगांत टाकण्यात आले. अशाच पद्धतीने कऱ्हाड तालुक्‍यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांनादेखील तुरुगांत टाकण्यात आले होते. यंत्रणांचा तपास झाला असेल तर त्यातून काय पुढे आले, हेदेखील समोर आले पाहिजे. ज्या बँका इंदिरा गांधींनी राष्ट्रीयीकृत केल्या त्या मोठ्या उद्योगपतींना ताब्यात देऊन विक्री करण्याचे काम काम भाजपा सरकारचे सुरू आहे. पक्ष आणि व्यक्‍ती बघून केंद्राकडून अशी कारवाई होते व त्याच धर्तीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाल्याची शक्‍यताही चव्हाण यांनी वर्तवली.

आणखी वाचा- सुरुवातही जनता करते आणि शेवटही, भाजपाचं संजय राऊतांना उत्तर

म्हणून महाविकास आघाडी सरकार सत्तेत

भाजपाच्या सामदामदंडभेद या नीतीला भेदण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आले आहे. भाजपाच्या नाकर्तेपणामुळे राज्याची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली आहे. केंद्राच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था धोक्‍यात आली असून येत्या काळात मंदी व कपातीसारख्या संकटाला सर्वच क्षेत्रांना सामोरे जावे लागण्याची भीतीही चव्हाण यांनी यावेळी वर्तवली.

“महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने संयुक्‍तपणे उमेदवार दिले आहेत. या दोन्ही उमेदवारांना शिवसेनेने पाठींबा दिल्याने ते सद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार बनले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही संयुक्‍त मेळावे घेतले. तसेच अनेक शिक्षण संस्थांना भेटी दिल्या,” असंही ते म्हणाले. तसंच महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.