News Flash

डिअर राजीव, वुई विल मिस यू…; सुप्रिया सुळेंनी व्हिडीओ केला ट्विट

"संघर्ष करणारा एक तरुण नेता गमावला"

सुप्रिया सुळे यांनी राजीव सातवांसोबतचा जुना व्हिडीओ ट्विट केला आहे.

काँग्रेसचे नेते तथा राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं रविवारी पहाटे पाच वाजता निधन झालं. करोनावर उपचार घेत असलेल्या राजीव सातव यांना आणखी एका विषाणूचा संसर्ग झाला. फुफ्फुसातील संसर्ग वाढत गेल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळाला धक्का बसला असून, मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेक नेत्यांनी हे धक्कादायक असल्याचं म्हणत आश्चर्य व्यक्त केलं. तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेकांना अश्रु अनावर झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक व्हिडीओ ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

सातव यांच्या निधनाच्या वृत्तानंतर खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या. “काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी करोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणुसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी खासदार राजीव सातव यांच्यासोबतचा एक जुना व्हिडीओ ट्विट केला. “डिअर राजीव, वुई विल मिस यू,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

करोनाविरुद्धची लढाई जिंकली, पण तरीही काळाने डाव साधलाच

राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती. त्यांनी करोनावरही मात केली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, फुफ्फसात संसर्ग वाढल्याने प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 12:09 pm

Web Title: congress leader rajeev satav death supriya sule tweet video bmh 90
Next Stories
1 “राजीव सातव तू हे काय केलंस?; चार दिवसांपूर्वीच आपण नि:शब्द हाय हॅलो केलं होतं”
2 हे वृत्त धक्कादायक! महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला -शरद पवार
3 राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमॅजिलो विषाणू नेमका काय?
Just Now!
X