उत्तर प्रदेशमध्ये दलित सरपंचाची हत्या करण्यात आल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. या घटनेनंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत काल (२१ ऑगस्ट) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांना आझमगड जिल्ह्याच्या सीमेवरच ताब्यात घेण्यात आलं. राऊत यांच्या दौऱ्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. पाटील यांच्या टीकेला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं असून, “चंद्रकांत पाटीलजी भाजपा इतका दांभिक कसा? आश्चर्य आहे”, असा सवालही उपस्थित केला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावरून टीका केली होती. “राज्यात जनता वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त आहे, शेतकरी त्रस्त आहेत, लोकं आत्महत्या करत आहे. मात्र ऊर्जामंत्री उत्तर प्रदेशात कसे? असा सवाल करत पाटील यांनी टीका केली होती. पाटील यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं आहे.

सचिन सावंत काय म्हणाले?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ वर्षात अर्धा काळ प्रचार मंत्री म्हणून देशातील प्रत्येक राज्यात प्रचार करत होते आणि त्याच वेळी देश आर्थिक डबघाईस जात होता. देशाला नोटबंदीच्या संकटात टाकून १२५ कोटी लोक रांगेमध्ये असताना विदेश दौऱ्याला गेले. ट्रम्पला नमस्ते करण्यासाठी व मध्य प्रदेशचे काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी लॉकडाउनची घोषणा पुढे ढकलून देशाला करोनाच्या संकटात ढकलले. आणि तुम्ही नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश यात्रेला आक्षेप घेता हे आश्चर्य आहे!

आणखी वाचा- “…अन्यथा निर्णय आणि कामं वेगाने झाली असती”, फडणवीस यांनी शिवसेनेवर साधला निशाणा

गेल्या सहा वर्षात देशात दलितांवर हल्ले वाढले. दलित समाजाचे देशात आंदोलन झाले पण मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडेंना पाठीशी घालणाऱ्या तुम्हाला आता दलित समाज आठवला? आश्चर्य आहे. ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात पूर आला त्यावेळी महाजनादेश यात्रा काढणाऱ्यांनी आणि पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून दिल्यानं संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी जाब विचारला तेव्हा त्यांना अरेरावी करून गप्प बसवणाऱ्यांनी आता उपदेश द्यावा, हे आश्चर्य आहे.

देश करोनाच्या संकटात जात असतानाही बिहारमध्ये प्रचार भाजपानं इतरांना उपदेश द्यावा, आश्चर्य आहे.