मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश असलेल्या ‘मुंबई रिव्हर अँथम’वरुन आता वाद सुरु झाला आहे. रिव्हर अँथम साँग तयार करणाऱ्या टी-सीरीजशी सरकारचा संबंध काय आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कंपनीशी कौटुंबिक नाते आहे का?, असा सवाल काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबईतील नद्यांच्या संवर्धनासाठी टी- सीरिजने ‘मुंबई रिव्हर अँथम’ तयार केले असून अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी हे गाणे गायले आहे. या रिव्हर अँथममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी देखील काम केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून काँग्रेसने या व्हिडिओवरुन सरकारला प्रश्न विचारले आहेत.

काँग्रेस नेते व प्रवक्ते सचिन सावंत यांनी सरकारला १० प्रश्नच विचारले आहेत. टी- सीरीज या कंपनीशी सरकारचा संबंध आहे की मुख्यमंत्र्यांचे कौटुंबिक नाते आहे? यासाठी काही देवाण- घेणाव झाली आहे का?, व्हिडिओत महाराष्ट्र सरकार किंवा माहिती व जनसंपर्क संचालनालयाचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे सरकारचा टी- सीरीजशी करार झाला आहे का? असल्यास त्या कराराचा मसुदा जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. सरकारचा या कंपनीशी संबंध असेल तर याच कंपनीची निवड का झाली, यासाठी कोणती प्रक्रिया राबवली गेली का, या व्हिडिओसाठी मुख्यमंत्री, अर्थमंत्री व अन्य अधिकाऱ्यांनी मानधन घेतले का, अन्य कलाकारांचे मानधन कोणी दिले, अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली आहे.

तसेच वर्षा हे सरकारी निवासस्थान असून तिथे चित्रीकरणासाठी परवानगी कोणी दिली, अधिकाऱ्यांना या खासगी व्हिडिओत काम करण्याचे आदेश दिले की त्यांनी स्वखुशीने काम केले, असेही प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केले आहेत. अतिव्यस्त कार्यक्रम व जबाबदारीतून वेळ काढून मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी व्हिडिओच्या चित्रीकरणासाठी वेळ दिला आणि अधिकारी देखील काम बाजूला ठेवून या व्हिडिओत सहभागी झाले. यावरुन मुंबईतील नद्यांसारखे जटील प्रश्न सुटतील असे सरकारला वाटते का, असा सवालच त्यांनी विचारला.
राज्यात १३ हजारांपेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून आता शेतकरी मंत्रालयात येऊन आत्महत्या करत आहेत. तसेच बेरोजगारी, कुपोषण, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढलेली महागाई अशा महत्त्वाच्या विषयांवरही सरकार व्हिडिओ तयार करणार का, असा खोचक प्रश्न त्यांनी केला. सरकारने या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.