News Flash

कंगना प्रकरण: सत्ताधारी पक्ष जाळ्यात अलगद अडकला : संजय निरुपम

बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर पालिकेनं केली होती कारवाई

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. दरम्यान, कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेची आता सोनिया सेना झाल्याचं म्हटलं आहे. बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही कंगनानं पालिकेवर आणि सरकारवर निशाणा साधला होता. यावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.

“सरकारमध्ये बसून आपण अशी कामं करू शकत नाही. यामुळे अतिशय चुकीचा संदेश जात आहे. ती (कंगना राणौत) भाजपच्या संपर्कात असू शकते. ती भाजपाच्या सांगण्यावरूनच हे सर्व करत असेल. परंतु एक राजकीय पक्ष आणि तोही सत्ताधारी पक्ष अशा जाळ्यात अलगद अडकत आहे? मी शांत बसू शकत नाही. ते चुकीचं वाटतं,” असं संजय निरूपम म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख

“उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं…फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत. काश्मिरी पंडितांना कसं वाटतं हे मला आज कळालं. आज मी या देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्या नाही तर काश्मीरवरही चित्रपट तयार करणार. आपल्या देशवासियांना जागरुक करणार. ही क्रूरता आणि दहशतवाद माझ्यासोबत झाला हे चांगलं आहे, कारण याचा काही अर्थ आहे. जय हिंद…जय महाराष्ट्र,” असं कंगना बुधवारी मुंबई आल्यानंतर म्हणाली होती.

पालिकेकडून कारवाई

कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. दरम्यान पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती. न्यायालयाने पालिकेकडे उत्तरही मागितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 10:58 am

Web Title: congress leader sanjay nirupam speaks on kangana ranaut issue mumbai pok statement shiv sena bmc jud 87
Next Stories
1 रियाला हे कोण सांगतंय?; आशिष शेलारांनी उपस्थित केली शंका
2 कंगना प्रकरण: महाविकास आघाडी सरकारमध्ये All Is Not Well
3 भायखळा तुरुंगात इंद्राणी मुखर्जी आणि रिया चक्रवर्ती एकत्र
Just Now!
X