News Flash

अमित शाह यांच्यासोबत जितिन प्रसाद यांच्या ‘त्या’ फोटोवर सत्यजित तांबेंचं खोचक ट्वीट; म्हणाले…!

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेश करणारे काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांना खोचक टोला हाणला आहे.

काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या जितिन प्रसाद यांचा हा फोटो सत्यजित तांबेंनी ट्वीट केला आहे.

बुधवारी सकाळी काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत दिल्लीतील भाजपा मुख्यालयात त्यांचा भाजपा प्रवेश झाला. एकीकडे हा काँग्रेससाठी मोठा झटका असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, त्याचवेळी काँग्रेसमधून मात्र जितिन प्रसाद यांच्या निर्णयावर तोंडसुख घेतलं जात आहे. प्रसाद यांच्या भाजपप्रवेशाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले असून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खोचक शब्दांमध्ये प्रसाद यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्यजित तांबे यांनी ट्वीटरवरून हा खोचक टोला लगावला आहे.

काय प्रतिकात्मक फोटो आहे!

सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये जितिन प्रसाद हे अमित शाह यांच्या बाजूला बसले आहेत. आणि या दोघांच्या मध्ये हनुमानाची छाती फाडून दाखवतानाची मूर्ती आहे. यावरून सत्यजित तांबे यांनी खोचक ट्विट केलं आहे. “काय प्रतिकात्मक फोटो आहे! इथे हनुमान छाती फाडून दाखवत आहेत. भगवान श्रीराम यांच्याप्रती आपली निष्ठा व्यक्त करत आहेत. आणि तिथेच जितिन प्रसाद देखील आहेत”, असं ट्वीट सत्यजित तांबे यांनी केलं आहे.

 

“फक्त भाजपाच राष्ट्रीय पक्ष”

जितिन प्रसाद यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या नेतृत्वावर आणि पक्षातील कामकाजाच्या पद्धतीवर देखील निशाणा साधला. “काँग्रेसमध्ये मला हे जाणवलं की आपण राजकारणात आहोत. जर तुम्ही तुमच्या लोकांच्या हितांचं रक्षण करू शकत नाहीत, त्यांची मदत करू शकत नाही, तर तुमचा राजकारणात राहून काय फायदा? मी काँग्रेसमध्ये हे करू शकत नव्हतो. गेल्या ३ दशकांपासून मी काँग्रेससोबत कार्यरत होतो. पण आज विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय. गेल्या ८ ते १० वर्षांमध्ये मला हे जाणवलं आहे की जर कुठला पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेल, तर तो भाजपा आहे. बाकी पक्षतर व्यक्तीकेंद्री आणि प्रादेशिक झाले आहेत. सध्या आपण ज्या परिस्थितीत आव्हानांचा सामना करत आहोत, तर त्यासाठी आज देशासाठी जर कुणी ठामपणे उभे आहेत, तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी”, अशी सूचक प्रतिक्रिया जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना दिली आहे.

जनतेनं साथ दिली, तर शरद पवार योग्य निर्णय घेतील -जयंत पाटील

महाराष्ट्रात पडसाद…

एकीकडे सत्यजीत तांबे यांनी जितिन प्रसाद यांच्या निष्ठेवरच अप्रत्यक्षपण बोट ठेवलं असताना दुसरीकडे भाजपा नेते निलेश राणे यांनी जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशावरून थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाच खोचक सल्ला दिला आहे. “राहुल गांधींच्या जवळचे सगळेच नेते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाच हा एक भाग आहे. मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वत: भाजपात प्रवेश करावा, हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे”, अशा शब्दांत निलेश राणेंनी राहुल गांधींवर टीका करतानाच त्यांना खोचक सल्ला देखील दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 9:53 pm

Web Title: congress leader satyajeet tambe mocks jitin prasad joined bjp pmw 88
Next Stories
1 आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘एसटी’ला शासनाकडून दिलासा ; ६०० कोटी रुपयांची मदत मिळणार
2 मराठा आरक्षण: “आयोगाच्या अहवालापूर्वीच पंतप्रधानांकडे मागणी करणं ही केवळ धूळफेक”
3 हिंगोली : खून प्रकरणातील आठ वर्षांपासून फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश
Just Now!
X