भाजपा आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यभरात त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे राजकीय पक्ष त्यांच्यांविरोधात रॅली काढून कारवाईची मागणी करत असताना सर्वसामान्यही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त आहेत. दरम्यान बुलडाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध भावजी यांनी राम कदम यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाखांचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान दुसरीकडे ‘एखादी मुलगी पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात तुम्हाला मदत करेन’, असे विधान केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भाजपाचे आमदार राम कदम यांना अखेर उपरती झाली आहे. गुरुवारी राम कदम यांनी ट्विटरवरुन महिलांची माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

गुरुवारी सकाळी राम कदम यांनी ट्विटरवर माफीनामा टाकला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाने राम कदम यांच्याकडून तात्पुरत्या स्वरुपासाठी प्रवक्तेपद काढून घेतले आहे. राम कदम यांना कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ नये असं सांगण्यात आल्याचं सुत्रांकडून कळत आहे.

आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान केले. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदम यांनी म्हटले होते. राम कदम यांचे हे विधान वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर प्रसारित होताच त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. विविध राजकीय पक्षांसह महिला संघटनांनीही राम कदम यांच्या विधानाचा निषेध केला. राज्याच्या महिला आयोगाने कदम यांना नोटीसही बजावली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader subodh bhanvji controversial remark on ram kadam
First published on: 06-09-2018 at 18:37 IST