‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवत जनतेची दिशाभूल करीत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात जनतेला ‘अच्छे दिन’ दाखविलेच नाहीत; उलट आपले अपयश झाकण्यासाठी हिंदू दहशतवादाचा मुद्दा पुढे केला जात असल्याची टीका, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिवंगत सहकार नेते ब्रह्मदेव माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.     त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. पतंगराव कदम, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. दिवंगत नेते ब्रह्मदेव माने यांचे सुपुत्र तथा सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांचा याचवेळी वाढदिवसानिमित्त शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी आयोजिलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या कार्यपध्दतीवर टीकास्त्र सोडले. दहशतवाद्यांना जात-धर्म नसतो. राजनाथसिंहांना त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. हिंदू दहशतवादाबद्दल आपण गृहमंत्री असताना खासगीस्वरूपात बोललो होतो. त्यावर लगेचच स्पष्टीकरणही दिले होते. परंतु आता या मुद्यावर देशात सामाजिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. यापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात असताना अटकेतील खतरनाक दहशतवाद्यांना विमानाने कंधार येथे नेऊन सोडण्याचे काम झाले होते. तीच मंडळी आता पुन्हा सत्तेवर आल्यानंतर दहशतवादावर काँग्रेसवर टीका करणे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली. आपण केंद्रात गृहमंत्री असताना अजमल कसाब व अफझल गुरू या दहशतवाद्यांना फासावर लटकावले होते. त्याचे कधीही राजकीय भांडवल केले नव्हते, अशी मल्लिनाथीही शिंदे यांनी केली.
डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांच्या ज्येष्ठतेवर शिक्कामोर्तब करीत, शिंदे यांचे नवी दिल्लीत वजन असल्याचे आपणास याअगोदर माहीत नव्हते. सत्ता गेल्यानंतर ही गोष्ट समजली, अन्यथा आपण यापूर्वीच त्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो असतो. आतादेखील शिंदे हे एवढे मोठे असूनही काँग्रेसजनांना लक्षात येत नाही, अशी टिप्पणी केली. तर हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यातील भाजप-सेना सरकारवर चौफेर हल्ला चढविला. पालकमंत्री देशमुख यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत पाटील यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अवस्था सरकारला केव्हा समजणार, असा सवाल केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपण आग्रही भूमिका घेतली असून हीच भूमिका कायम असल्याचे नमूद केले. कर्जमाफी देण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, शेकापचे नेते, आमदार गणपतरावल देशमुख, पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक आदींनी भाषणे केली. सभापती दिलीप माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. या मेळाव्यास सुमारे सहा हजार शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.