सुप्रसिद्ध लेखक आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे. MBIFL 19 या फेस्टिव्हलमध्ये व्याख्यान देण्यासाठी शशी थरुर आलेले असताना त्यांना एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला की व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आलेच नसते तर काय घडलं असतं? त्यावर शशी थरुर यांनी हे उत्तर दिले आहे की व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आलेच नसते तर देशावर मराठ्यांचं राज्य असतं असं उत्तर दिलं आहे.

आपल्या भाषणात त्यांनी तंजावरचं उदाहरणही दिलं आहे. संभाजी महाराजांना सांभार खावसं वाटत होतं म्हणून ते खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलं. त्यानंतर हा पदार्थ दक्षिणेत आला त्यामध्ये स्थानिक मसाले, चिंच यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे सांबार ही मराठ्यांनी दिलेली देणगी आहे. संभाजी महाराजांना ते आवडत असे त्यामुळे त्याचे नाव सांभार असे पडले होते असंही शशी थरुर यांनी म्हटले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनीही महाराष्ट्रात त्यांचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्यानंतरही पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले हे आपल्याला इतिहासावरुन ठाऊक आहेच. त्याचमुळे जर इंग्रज भारतात आले नसते तर मराठ्यांनीच देशावर राज्य केलं असतं असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे.

पहा व्हिडिओ 

आपल्या साधारण तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये थरुर यांनी देशात आपल्या वेगळं असण्याचा इंग्रजांनी कसा फायदा घेतला ते देखील सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरलही होतो आहे.

अहमद शाह अब्दाली याने पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव केला. हा पराभव मराठ्यांसाठी धक्कादायक म्हणावा असा पराभव होता. अहमद शाह अब्दालीला भारतावर राज्य करायचं नव्हतं. तो आला त्याने लढाई केली, या ठिकाणी असेला खजिना लुटला, मौल्यवान हिरे, जवाहिर लुटून नेले आणि तो अफगाणिस्तानला परतला. मात्र समजा हा पराभव झाला नसता आणि देशात इंग्रज आलेच नसते तर या देशावर म्हणजेच भारताव मराठ्यांनी राज्य केलं असतं असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या भाषणाची क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे.