News Flash

“नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल”

"डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर"

करोनामुळे जाहीर झालेला लॉकडाउन ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु असून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहे. बुधवारी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपट आणि नाटय़गृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान नोव्हेंबरच्या अखेपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुंबई लोकल सुरु करण्यासंबंधी लवकरच राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि रेल्वेवर निशाणा साधला. “रेल्वे सुरु करण्यासंबंधी खरं तर आमची चार पत्रं होती. त्याला परवानगी न देता काही त्रुटी काढल्या जात आहे. सरकार आणि रेल्वेला क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी घ्यावं. आम्ही रेल्वे विभागाला तीन पत्रं पाठवली आहेत. त्यावर सुरक्षेसाठी काय करणार, गर्दी टाळण्यासाठी काय करणार आम्हाला विचारत आहेत. आम्ही सगळी यंत्रणा राबवत आहोत. राज्य सरकार याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,” असं त्यांनी सांगितलं.

“राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असून या महिनाअखेर राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणली जाईल. डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

धार्मिकस्थळे बंदच
धार्मिळस्थळे सुरू करण्याची मागणी करण्यात येत असली तरी सरकारने अद्याप तरी धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिरांची कुलुपे उघडण्याचा इशारा दिला तरीही सरकारने धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय घेतलेला नाही. राज्यात धार्मिकस्थळे आणि शाळा-महाविद्यालयांवरच सध्या तरी निर्बंध लागू आहेत.

सिनेमा, नाटक सुरू
करोना नियंत्रणासाठी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपट आणि नाटय़गृहे आजपासून (गुरुवार) खुली होणार आहेत. त्यामुळे लाखो नागरिकांना रोजगार देणारा मनोरंजनाचा महत्त्वाचा उद्योग पुन्हा श्वास घेताना दिसेल. दिवाळी जवळ आल्याने चित्रपटगृहे आणि नाटय़गृहे सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी या क्षेत्रांतून करण्यात येत होती. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाटय़गृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मराठी रंगभूमीदिनी नाटय़गृहे सुरू होत असल्याबद्दल या क्षेत्रातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

सांस्कृतिक कार्य विभाग लवकरच नियमावली जाहीर करणार आहे. सिनेमागृह, नाटय़गृहात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आली आहे. बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, शूटिंग आदी सर्वप्रकारच्या बंदिस्त क्रीडाप्रकारांना अंतरनियम राखण्याच्या आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या अटींवर परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे योग संस्थांनाही परवानगी देण्यात आली आहे. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सरावासाठी तरणतलावांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त खेळाडू असा उल्लेख असल्याने सर्वसामान्यांना लगेचच तरणतलावाचा वापर करता येणार नाही. मुंबईत सर्वाना उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्याबाबत राज्य सरकारने सकारात्मकता दाखविली असली तरी रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे त्याबाबतचा कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. सभागृहे तसंच राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम, सोहळ्यांवरील बंदी कायम राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 9:12 am

Web Title: congress leader vijay wadettiwar on lockdown in maharashtra sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 खोपोलीमध्ये स्फोटानंतर भीषण आग, चार किमीपर्यंत स्फोटाचा आवाज; एक ठार चार जखमी
2 भाजपावाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटते; शिवसेनेची टीका
3 अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
Just Now!
X