खासदार हेमंत पाटील यांचा पत्रकार बैठकीत आरोप

नांदेड : शहरासह परिसरातील तसेच ग्रामीण भागातील जमिनीवर आरक्षण टाकून संगनमताने जमिनी बळकावण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांनी सुरू केला असून बांधकाम व्यावसायिक व भूमाफियांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे, असा आरोप  खासदार हेमंत पाटील यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असून शिवेसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.

शहरातील सांगवी, कौठा, तरोडा, असदवन, असर्जन, म्हाळजा, तसेच अन्य ग्रामीण भागातील जमिनीवर आरक्षण टाकण्यात आले असून अनेक पक्क्या घरांवर तसेच मोकळ्या भूखंडांवरही आरक्षण टाकण्यात आले आहे. शहरातील २३५ ठिकाणी आरक्षण टाकण्यात आले आहे. शहरालगतच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. भूमाफियांना हाताशी धरून काँग्रेसच्या मंडळींनी हा डाव रचला आहे. यामध्ये काँग्रेसचे आजी-माजी नेते मंडळी, भूमाफिया असल्याचा आरोपही खासदार पाटील यांनी केला आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकतानाच बांधकाम व्यावसायिक व भूमाफियांच्या जमिनीवर मात्र आरक्षण टाकण्यात आले नाही. यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे ते या वेळी म्हणाले. या आरक्षणामुळे गोरगरीब शेतकरी, मालमत्ताधारक अडचणीत आले आहेत. हे आरक्षण टाकण्यामागे कोणाचा हात आहे, असा सवालही खासदार पाटील यांनी उपस्थित केला. आरक्षणाची भीती दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी अर्ध्या किमतीत घेण्याचा प्रयत्न काही दलालांकडून केला जात असून या दलालांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

याबाबत मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार असून आरक्षण रद्द करावे, अशी मागणी करणार असल्याचे या वेळी खासदार पाटील म्हणाले. शिवेसेनेने नेहमी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला असून आरक्षण रद्द करावे यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या पत्रकार बैठकीस शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, बाळासाहेब देशमुख बारडकर, नगरसेवक बालाजी कल्याणकर, सचिन किसवे आदींची उपस्थिती होती.

काँग्रेसचा ठराव हा धूळफेक

आरक्षण रद्द करण्याचा ठराव महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेसने घेतला असून हा ठराव घेऊन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम काँग्रेसने केले आहे, असाही आरोप खासदार हेमंत पाटील यांनी केला.  वादग्रस्त नगररचनाकार रझाखान यांच्या रझाकारीला जनता कंटाळली असून बेबंदशाही कारभारातून त्यांनी करोडोची माया जमविली आहे. त्यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी. तसेच त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करून खासदार हेमंत पाटील यांनी या संदर्भात शिवसेना स्टाइलने या रझाकारीला उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.