सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी सोमवारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या उपस्थितित भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि मराठा महासंघाचे नेते शशिकांत ऊर्फ एस. टी. सावंत, कणकवली येथील युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष हरेश पाटील, देवगड येथील हरकुळ ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश पावसकर, लोरे जिल्हा परिषदेचे गट प्रमुख प्रदीप कामतेकर यांच्यासह २०० कार्यकत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
विधानसभेमध्ये महायुती कोकणात बाजी मारेल – तावडे
कोकणातील कॉंग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात असून, योग्यवेळी हे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने कोकणात जोरदार मुसंडी मारली. महायुतीच्या झंझावातापुढे सिंधुदुर्गातील अनेक कॉंग्रेसचे नेते फिके पडले आहेत. त्यामुळे कोकणातील कॉंग्रेसच्या पडझडीला सुरुवात झाली आहे. भाजपमध्ये आज प्रवेश केलेले अनेक नेते तेथील कॉंग्रेसच्या कारभाराला कंटाळलेले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीचा पराभव निश्चित असून, यामध्ये महायुती बाजी मारेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.