मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आज काळी गुढी उभारून पदाधिकाऱ्यांचा निषेध केला. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
मुळा-प्रवरा वीज संस्थेचा वीज वितरण परवाना रद्द करून महावितरणला तो देण्यात आला आहे. त्यामुळे संस्थेचे १ हजार ६०० कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या थकीत रकमा अद्याप मिळालेल्या नाहीत. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के, उपाध्यक्ष सचिन गुजर यांनी या रकमा देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आज कामगारांनी संस्थेच्या आवारात काळी गुढी उभारून निषेध नोंदवला. या वेळी सुरेश करपे, बापू सदाफळ, संजय थोरात, लक्ष्मण जाधव आदींची भाषणे झाली.
मुळा-प्रवराचे कामगार आघाडीचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. सेना-भाजप युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना ते पाठिंबा देणार आहेत, तसेच गावोगाव जाऊन जागृती घडवणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. सभेस मुकुंद जाधव, शांत्वन हरदास, संजय गिरमे, संजय मेहेत्रे, आबा हरिश्चंद्रे, शेखर देशपांडे, विलास शिरसाठ, रवि उंडे, दिलीप भापकर, संतोष काळभोर, राजू गुळवे, प्रकाश खैरे, दिलावर शेख, फिरोज शेख, विजय बर्डे आदी ५०० ते ६०० कर्मचारी उपस्थित होते.