आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येवून ठेपली आहे. या निवडणूकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा असा चंग कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी बांधला असून त्यादृष्ठीने मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.  गांधीभवन येथे इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात येवून १२ इच्छुक उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे निरीक्षक भीमराव डोंगरे यांनी दिली .

लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या २० वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात असलेली औरंगाबाद लोकसभेची जागा जिंकण्यासाठी काँग्रेस पक्षाचे मोर्चेबांधणी करीत सुक्ष्म व्युहरचना सुरू केली आहे. गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता शहागंज येथील काँग्रेसच्या गांधीभवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होवून कोणता उमेदवार निवडून येवू शकतो यावर कार्यकत्र्यांची मते जाणून घेण्यात आली.

यासाठी जालना येथून आलेले पक्षाचे निरीक्षक भीमराव डोंगरे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजीमंत्री अनिल पटेल, माजी आ.नितीन पाटील, प्रकाश मृगदीया, माजी महापौर अशोक सायन्ना यादव यांनी इच्छुकांची मते जाणून घेतली. यावेळी जालन्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, कन्नड तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते, खुलताबाद तालुका अध्यक्ष अनिल श्रीखंडे, नसीर नजीर खान, मुज्जफर खान, साहेबराव बनकर आदींची उपस्थिती होती.

काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी विद्यमान आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, विधान परिषद सदस्य आ. सुभाष झांबड, काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार डॉ.कल्याण काळे, रविंद्र बनसोड, इंजिनियर मिलिंद पाटील, किरण पाटील डोणगांवकर, पक्षाचे ज्येष्ठ नेते इब्राहीम पठाण, मोहन देशमुख, पृथ्वीराज पवार, युसूफ मुकाती, अरूण दापकेकर आदी उमेदवार इच्छुक असून त्यांच्या नावांची यादी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे पक्षाचे निरीक्षक भीमराव डोंगरे यांनी सांगितले.

१२ जणांच्या यादीत आठ उमेदवार मराठा समाजाचे

लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या १२ उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये ८ इच्छुक उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत. तर २ जण मुस्लीम समाजाचे आहेत. तसेच जैन आणि दलित समाजाच्या प्रत्येकी एका उमेदवाराने लोकसभा निवडणूकीचे तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे काँग्रेस पक्षाच्या यादीवरून दिसून येते.