News Flash

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासंबंधी काँग्रेसचे राज्य प्रभारी एच के पाटील यांचं निवेदन; म्हणाले….

काँग्रेसची नेमकी भूमिका काय?

संग्रहित छायाचित्र

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवर काँग्रेसचे राज्य प्रभारी एच के पाटील यांनी निवेदन प्रसिद्ध केलं आहे. विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशीद अल्वी यांनीदेखील राजीनाम्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मात्र ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यातच एच के पाटील यांनी हे निवेदन दिलं आहे.

निवेदनात काय म्हटलं आहे –
“महाराष्ट्रातील स्थितीविषयी विधीमंडळ नेता, वरिष्ठ मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसोबत मी चर्चा केली. माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत कोअर कमिटीचे सदस्य असणारे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. अनिल देशमुख यांनी निवेदन प्रसिद्ध करत मुख्यमंत्र्यांना योग्य प्रकारे तपास करण्याची विनंती केली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आधीच प्रसारमाध्यमांशी चर्चा करत ‘आम्ही राजीनाम्यावरही चर्चा करु. जे पर्याय असतील त्यावर चर्चा होईल, राजीनामादेखील एक पर्याय आहे’ असं सांगितलं,” असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, “राष्ट्रवादीने चर्चा करुन निर्णय घेऊ असं सांगितलं असून अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याचं स्प्ष्ट केलं आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या कोअर ग्रुपचे सदस्य आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार असून चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री लवकरात लवकर यासंबंधी अंतिम निर्णय घेतील”.

अनिल देशमुखांनी राजीनामा देण्याचा राशीद अल्वी यांचा सल्ला
काँग्रेस नेते राशीद अल्वी यांनी अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. “परमबीर सिंह यांनी पदावर असताना कोणतंही वक्तव्य केलं नाही, कोणतीही तक्रार केली नाही. त्याचवेळी करायला हवं होतं. जर ते पोलीस आयुक्तपदी कायम असते तर कदाचित त्यांनी तक्रारच केली नसती. त्यांचा तपास व्हायला हवा. यासोबतच गृहमंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे. यामध्ये एक नाही तर तीन-चार पोलीस अधिकारी सहभागी आहेत. त्यामुळे जोपर्यंत तपास सुरु आहे तोपर्यंत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा माझा सल्ला आहे. तपासाअंती जर गृहमंत्री निर्दोष असतील तर पुन्हा शपथ घेऊ शकतात,” असं राशीद अल्वी यांनी म्हटलं आहे.

सचिन सावंत यांचं ट्विट
“अनेकजण कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करु शकतात. हे त्यांचं वैयक्तिक मत म्हणून ग्राह्य धरलं पाहिजे. फक्त पक्षाचे अध्यक्ष आणि प्रवक्त्यांचं वक्तव्य ही पक्षाची भूमिका म्हणून पाहिलं पाहिजे. राशीद अल्वी काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते नाहीत,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 3:24 pm

Web Title: congress maharashtra in charge h k patil home minister anil deshmukh parambir singh letter sgy 87
Next Stories
1 कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही! “ये पब्लिक है, ये सब जानती है!” – दरेकर
2 देशमुख क्वारंटाईनमध्ये होते, तर मग ‘हे’ नेमके कोण आहेत?; फडणवीसांचा पवारांना सवाल
3 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा- प्रकाश आंबेडकर
Just Now!
X