लातूर, : लातूर महापालिकेत काठावर बहुमत असलेल्या भाजपला सत्ता टिकवण्यात अपयश आले आहे. भाजपची दोन मते फुटल्याने काँग्रेसचा महापौर निवडून आला.

काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना ३५, तर भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांना ३३ मते पडली. चंद्रकांत बिराजदार आणि गीता गौड या दोन भाजप नगरसेवकांनी पक्षादेश झुगारत काँग्रेसला मतदान केले, तर महापौर पदाच्या निवडणुकीत साथ दिलेल्या चंद्रकांत बिराजदार यांना काँग्रेसने उपमहापौर पदासाठी पाठिंबा दिला. चंद्रकांत बिराजदार यांना ३५ मते, तर भाजपच्या भाग्यश्री कौळखिरे यांना ३२ मते मिळाली. भाजपच्या शकुंतला गाडेकर मतदानावेळी अनुपस्थित राहिल्या. एकूण ७० सदस्यीय लातूर महानगरपालिकेत भाजपचे ३६, काँग्रेसचे ३३ व राष्ट्रवादीचा एक नगरसेवक असे संख्याबळ होते. भाजपचे शिवकुमार गवळी यांचे निधन झाल्याने त्यांचे संख्याबळ ३५ वर आले. काँग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के यांना न्यायालयात जावे लागल्याने ते मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळे संख्याबळ ३२ झाले. राष्ट्रवादीचे राजा मणियार यांनी काँग्रेसला साथ दिली व भाजपच्या दोन नगरसेवकांनी काँग्रेसला मतदान केले.

काँग्रेसचे नूतन महापौर विक्रांत गोजमगुंडे हे स्थायी समितीचे माजी सभापती होते. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. १९८९ ते १९९२ या कालावधीत विक्रांत गोजमगुंडे यांचे वडील विक्रम गोजमगुंडे हे लातूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते.

कार्यकर्त्यांचा जल्लोष : पालिकेत सत्ता आल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले. भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे या निवडणुकीत व्यूहरचना आखत होते. भाजपच्या पराभवाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, काँग्रेसने लोकशाही मार्गाने विजय मिळवला नसून घोडेबाजार करून पालिकेत सत्ता आणली आहे.