राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. मात्र काँग्रेसकडून तशी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी यासंबंधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जावी अशी मागणी केली आहे. सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारला तशी सूचना करावी असंही पत्रात म्हटलं आहे.

मिलिंद देवरा यांनी पत्रात लिहिलं आहे की, “गेल्या ५० दिवसात शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात व्यस्त आहे. महाराष्ट्रातील मतदारदेखील सरकारच्या कामाचं आणि निर्णयांचं स्वागत करत आहे”.

“मार्च २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी मुंबईमधील रॅलीत भाषण करताना मी दिलेल्या सल्ल्यानंतर गरिबांना ५०० स्क्वेअर फूट घर देण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर हा मुद्दा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला होता,” याची आठवण मिलिंद देवरा यांनी करुन दिली आहे.

“राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी असताना मुंबईकरांना हे आश्वासन दिलं होतं. अद्यापही त्याची अमलबजावणी करण्यासाठी काहीच सुरुवात न झाल्याने मला चिंता वाटत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला आपण अनेक आश्वासनं दिली आहेत. त्यामुळे या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्रात प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. जेणेकरुन महाराष्ट्र सरकार काँग्रेसने दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात यशस्वी ठरेल,” असंही मिलिंद देवरा यांनी पत्रातून म्हटलं आहे.