कराड : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत काँग्रेस देशातील जनतेची दिशाभूल करीत आहे. तर, काँग्रेसच्या दबावामुळे शिवसेनेचा नागरिकत्व कायद्याला विरोध झाल्याची टीका केंद्रीय सामाजिकन्याय मंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचे सरकार फार काळ टिकणार नसून, ताठ मानेने सरकार चालवायचं असेल तर शिवसेनेने भाजप आणि रिपाइंसोबत यायला हवे, असा सल्लाही आठवलेंनी या वेळी दिला.

आठवले म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमचा प्रश्न आहे की बांगलादेशाच्या लोकांना हाकला, अशी मागणी त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय राऊत करत होते. आता नागरिकत्व कायद्याला विरोध करून ते बांगलादेशींनाच मदत करत आहेत. याचाच अर्थ उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या दबावाखाली काम करत आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सत्तेवर येण्यापूर्वी राज्यातील जनतेला सरसकट कर्जमाफी व संपूर्ण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, स्वत: उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असतानाही सध्याच्या राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ केले आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूक असून, दोन लाखांपेक्षा ज्यादाचे कर्ज असणाऱ्या बळिराजावर अन्याय झाला. त्यामुळे आता महाविकास आघाडीने सरकारचा सातबारा कोरा करण्याची वेळ आली असून, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा न केल्यास राज्यव्यापी आंदोलने छेडली जातील असा इशारा आठवले यांनी दिला.

विद्यमान राज्य सरकारमध्ये अनेक मुद्दय़ांवर मतभेद आहेत. महाविकास आघाडीचं सरकार अल्पायुषी असून, भविष्यात पुन्हा शिवसेना ही भाजप आणि रिपाइंसोबत एकत्र येईल असे भाकित आठवले यांनी केले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अनुषंगाने काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाचे लोक मुस्लिम समाजाचा गैरसमज करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा कायदा अजिबात मुस्लिमविरोधात नसल्याचा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने मागासवर्गीय महामंडळांची कर्जे माफ करावीत, अशी रिपाइंची मागणी व सीएए कायद्याच्या समर्थनार्थ येत्या १० जानेवारीला सर्व जिल्हाधिकारी कचेऱ्यांसमोर धरणे, निदर्शने छेडली जातील, असाही इशारा आठवले यांनी दिला.