मुंबई महापालिकेचे आयुक्त सर्व विभागांना न्याय देऊ शकत नसल्याने मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करा, अशी मागणी आमदार नसीम खान यांनी विधानसभेत केली. या मागणीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी आक्षेप घेत हा मुंबईसाठी लढलेल्या शेकडो हुतात्म्यांचा अवमान असल्याचा आरोप केला. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेच्या त्रिभाजनाच्या मागणीवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी साकीनाका आग प्रकरणाचे पडसाद उमटले. विधानसभेत चर्चेदरम्यान काँग्रेस आमदार नसीम खान यांनी साकीनाका येथील आगीचा मुद्दा उपस्थित केला. आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना घडतात. आयुक्त आणि अन्य अधिकारी जनतेला सुविधा देऊ शकत नसतील तर मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करावे, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई आणि उपनगरांची संख्या वाढल्याचे त्यांनी नमूद केले.

नसीम खान यांनी हा मुद्दा उपस्थित करताच शिवसेना व भाजपचे आमदार आक्रमक झाले. त्यांनी नसीम खान यांच्या मागणीला विरोध दर्शवला. गदारोळामुळे कामकाज तहकूब करावे लागले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील या मागणीला विरोध दर्शवला. त्रिभाजन केल्यास मुंबईसाठी लढलेल्या शेकडो हुतात्म्यांचा अवमान होईल, असा आरोप त्यांनी केला. यापुढे मुंबईच्या विभाजनाची भाषा सभागृहात वापरु नये, असेही त्यांनी सांगितले.  शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी भाजप- शिवसेनेला प्रत्युत्तर दिले.

शहराच्या वाढत्या पसाऱ्यामुळे महापालिकेचे विभाजन करणे आवश्यक आहे. यात वादाचा काहीच विषय नाही. मात्र याला वेगळे स्वरूप दिले जात असून पुणे महापालिकाही दोन विभागात आणण्याबाबत आम्ही विचार करत होतो, असे त्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातही पाच ते सहा महापालिका आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. आम्ही सर्व जण मुंबई महाराष्ट्रातच राहावी याच मताचे आहोत, मुंबईच्या विभाजनाचा आरोप चुकीचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुरवणी मागण्यांवर सभागृहात चर्चा सुरू असताना निम्म्यापेक्षा अधिक मंत्री सभागृहात उपस्थित नसतात, असा आरोपही पवार यांनी केला आहे. ही बाब फार गंभीर असून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना मंत्र्यांचे असे वागणे अशोभनीय असल्याचे त्यांनी सांगितले.