विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. सावनेर मतदार संघाचे आमदार सुनिल केदार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनिल केदार यांच्या या व्हिडीओमुळे नागपूरमधील राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सुनिल केदार यांनी कार्यकर्त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. यामध्ये ते म्हणाले की, ‘जे कुणी भाजपाचा झेंडा घेऊन फिरतील त्यांना घरात घुसून मारू.’ केदार यांच्या या वक्तव्यानंतर सावनेरमध्ये तणावाचे वातावरण आहे. हा व्हिडीओ १२ तारखेच्या सभेमधील असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आमदार केदार यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप भाजपाचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केला आहे.


सुनिल केदार हे काँग्रेसचे नागपूर जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. सिलेवाडा येथे सिटी बसच्या उद्घाटनाचा कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्यामुळे या वादाला सुरूवात झाली आहे. त्यानंतर एका कार्यक्रमात केदार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिली. या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, नागपूरात काँग्रेसकडे असलेल्या एकमेव सावनेर मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील केदार यांच्या विरुद्ध भाजप कोणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोद्दार ही दोन नावे या जागेसाठी चर्चेत आहेत. मानकर यांनी यापूर्वी येथून निवडणूक लढवली होती. पोद्दार पाच वर्षांपासून तयारी करीत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सावनेरचा उमेदवार ठरवताना महत्त्वाची असणार आहे.