काँग्रेसचा तरुण चेहरा हरपला

हिंगोली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय राजकारणातील पक्षाचे अभ्यासू नेते अ‍ॅड. राजीव सातव यांचे रविवारी पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

गेल्या २३ दिवसांपासून सातव यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने काँग्रेस एका उमद्या नेत्यास मुकल्याची प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. करोना नियमांचे पालन करून सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.

कळमनुरी तालुक्यातील मसोड पंचायत समिती गणातून २००२ मध्ये निवडून आलेल्या सातव यांचा युवक काँग्रेसच्या बांधणीच्या निमित्ताने दिल्ली येथे वावर वाढत गेला. संघटनात्मक बांधणीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमवेत असणारा नेता अशी सातव यांची ओळख होती. माजी मंत्री रजनी सातव यांच्याकडून त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले होते. पंचायत समिती, जिल्हा  परिषद सदस्य अशी एकेक पायरी चढत राजीव सातव खासदार झाले.

२००७ मध्ये खरवड गटातून निवडून आल्यानंतर त्यांनी कृषी सभापतिपद सांभाळले होते. शेतीत नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिरत्न पुरस्कार देण्यास त्यांनी सुरुवात केली. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून ते २००९ मध्ये निवडून आले. त्यांच्या प्रयत्नातून कळमनुरी येथे सशस्त्र सीमा दल, औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याच्या कामात पुढाकार घेतला. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात हिंगोलीसारख्या मागास भागात लिगो इंडियाचा गुरुत्वीय लहरींबाबत संशोधनाचा प्रकल्प हाती घ्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. २०१४ मध्ये मोदी लाटतेही ते हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध विषयांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी पक्षाचे धोरण ठरविण्याच्या कामात मोठे योगदान दिले. त्यानंतर लोकसभा निवडणूक न लढवता पक्षवाढीसाठी त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये प्रभारी म्हणूनही नेमण्यात आले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच काँग्रेस नेतृत्वाने २०२० मध्ये त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड केली होती.

सातव यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूचेही त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष होते. मात्र, २३ दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. सातव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला.

राजीव सातव यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले. काँग्रेसची मूल्ये अंगी बाणविलेले राजीव हे अफाट क्षमतेचे नेते होते. त्यांच्या निधनाने आम्हा सर्वाचे मोठे नुकसान झाले आहे.

– राहुल गांधी