“आततायीपणा कुणीही करु नये. पण एक चांगली शिस्त जर लावली जात असेल आणि जनतेचं हित त्यामध्ये साधलं जात असेल तर मी तुकाराम मुंढेंच्या पाठिशी आहे.” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. परंतु यावरून आता काँग्रेसच्या आमदारानं मुख्यमंत्र्यांना केवळ तुकाराम मुंढे यांची एकच बाजू माहित आहे. त्यांना आम्ही नाण्याची दुसरीही बाजू लक्षात आणून देणार असल्याचं म्हटलं आहे. यावरूनच मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य महाविकास आघाडीतल्याच काही नेत्यांना पटलं नसल्याचं दिसत आहे.

काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी यापूर्वीही आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती. “उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. परंतु नागपूरबद्दल त्यांना नाण्याची एकच बाजू माहित असेल. आम्ही त्यांची भेट घेऊन नाण्याची दुसरी बाजूही सांगू. नागपूरच्या जनतेचे आणि लोकप्रतिनिधींचं कुठे चुकलं हेदेखील त्यांना विचारू,” असं ते म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

“जनतेची भूमिका समजून घेणं हे अधिकाऱ्यांचं काम आहे आणि तसं केल्यासच जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. नागपुरात लोकप्रतिनिधी म्हणून तीन दशकांचा मला अनुभव आहे. तेही अधिकारी जर आमचं ऐकणार नसतील तर आम्ही त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं,” असा सवालही त्यांनी केला. सध्या करोनाच्या संकटात उद्धव ठाकरे यांनी मुंबईला उत्तमरित्या सांभाळलं. ते मुंझे यांना नागरपूरला सांभाळण्याबद्दलही समज देतील असा विश्वासही विकास ठाकरे यांनी बोलताना व्यक्त केला.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

“नागपूर महापालिका विरुद्ध तुकाराम मुंढे यांचा वाद सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. एखादा अधिकारी कठोर आणि कडक शिस्त पालन करणारा असू शकतो. तुकाराम मुंढे यांनी लोकहिताचे निर्णय घेतले. नागपूरमध्ये त्यांनी एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलेले निर्णय जर काही लोकांना पटत नसतील त्यांनी हे लक्षात घ्यावं की तिथे आता निवडणुकीचा जमाना नाही. मतदार वाचले तर मतदान होईल हे लक्षात घ्यावं. अशा सगळ्या वातावरणात तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने जर एखादी गोष्ट अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठिशी उभं राहिलंच पाहिजे. आततायीपणा कुणीही करु नये. पण एक चांगली शिस्त जर लावली जात असेल आणि जनतेचं हित त्यामध्ये साधलं जात असेल तर मी तुकाराम मुंढेंच्या पाठिशी आहे.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.