मंत्री थोरात यांच्या मध्यस्थीने शिवसेनेशी चर्चा करणार -काळे

नगर : जातीयवादी पक्षाला बाजूला करत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला महापौरपदाची संधी मिळावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. महापौर पदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसने शीला दीप चव्हाण यांच्या नावाचा ठराव केला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला संधी मिळावी, यासाठी पक्षाचे शिष्टमंडळ काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी ही माहिती दिली. महापालिका स्थापन झाल्यापासून काँग्रेसला महापौर पदावर एकदाच संधी मिळाली. महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला महापौर पदावर यापूर्वी अनेकदा संधी मिळाली आहे, याकडे काळे यांनी लक्ष वेधले. महापौर पद अनुसूचित जाती (महिला) राखीव असल्याने या विभागातील पक्षाच्या नगरसेविका शीला चव्हाण यांच्या उमेदवारीचा ठराव केल्याचे काळे यांनी सांगितले.

काँग्रेसचे मनपात पाच नगरसेवक आहेत. संख्यात्मकदृष्ट्या जरी काँग्रेसची ताकद कमी असली तरी मनपा स्थापनेपासून राष्ट्रवादीला तसेच शिवसेनेला प्रत्येकी तीन वेळा महापौर पद मिळाले आहे. एक अपवाद वगळता काँग्रेसला मागील अनेक वर्षांपासून शहरात संधी मिळाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सर्वाधिक नगरसेवकांची संख्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेना महापौर पदाचे प्रबळ दावेदार असणे आम्ही समजू शकतो. पक्ष म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. पण काँग्रेसला देखील संधी मिळाली पाहिजे.

जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवत राज्याप्रमाणे शहरातही महाविकास आघाडी एकत्र आल्यास मनपावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकू शकेल असा दावा त्यांनी केला. मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली महापौर निवडणुकीबाबत शिवसेनेशी काँग्रेस चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या यशात काँग्रेसचा वाटा

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या आघाडीमुळेच नगर शहरामध्ये राष्ट्रवादीला आमदारकीचे यश आले. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या विजयामध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे, मनपा निवडणुकीतही आघाडीच होती. याचा राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला आहे. आता राष्ट्रवादीने काँग्रेसला महापौर पदासाठी साथ देत त्याची परतफेड करावी, असे आवाहन किरण काळे यांनी राष्ट्रवादीला केले आहे.