शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं असं विधान केलं आहे. दिल्लीत बोलताना संजय राऊत यांनी युपीए विकलांग झाली असल्याचं ते म्हणाले आहेत. युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दरम्यान संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का असा उल्लेख केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये इतकाच आमचा सल्ला आहे,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधी संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…

शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं वृत्त असून याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटल्याची चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी मात्र काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं वृत्त फेटाळलं आहे. युपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही असंही ते म्हणाले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

“काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिया गांधीचीही तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.