शिवसेनेला दोन, भाजप व मनसेला प्रत्येकी एक अपक्षांना तीन जागा
दिंडोरी नगर पंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने १० जागा जिंकत बाजी मारली असून शिवसेनेला दोन, भाजप व मनसे प्रत्येकी एक आणि अपक्षांना तीन जागा मिळाल्या. साम, दाम, दंड या त्रिसूत्रीचा यथेच्छ वापर झालेल्या या निवडणुकीत सेना आणि भाजपच्या विद्यमान खासदारांसह आजी-माजी आमदार, काही मंत्र्यांनीदेखील प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु मतदारांनी या दोन्ही पक्षांना दूर ठेवल्याचे निकालावरून दिसून येते. एकूण १७ जागांसाठी ९१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे यांच्या उमेदवारांचा समावेश होता. काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी १० आणि सात असे जागा वाटप करत आघाडी केली होती. त्याचा काँग्रेसला अधिक लाभ झाला असून काँग्रेसने सात, तर राष्ट्रवादीने तीन जागांवर यश मिळविले. युतीमध्ये राज्यस्तरावर निर्माण झालेल्या मतभेदांचे पडसाद या निवडणुकीवर पडल्याने शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुकीस सामोरे गेले. त्याचा फटका दोघांना बसला. शिवसेनेला दोन तर भाजपला केवळ एकच जागा मिळाली. भाजपकडून खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.
माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणूक लढवली. दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख सुहास सामंत, धुळे संपर्कप्रमुख जयंत दिंडे हे समर्थकांसह तळ ठोकून होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. नरहरी झिरवाळ, कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्यासह त्यांचे समर्थक यांनीही प्रचारात जोर दिला होता. माजी आमदार रामदास चारोस्कर यांचा प्रचारातील सहभाग उल्लेखनीय ठरला.
मतदानाची टक्केवारी ८५ पर्यंत पोहोचल्याने दिंडोरीकरांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, याविषयी उत्सुकता वाढली होती.निवडणुकीत अर्थपूर्ण वाटाघाटीदेखील मोठय़ा प्रमाणात झाल्या. तालुक्याचे गाव असूनही दिंडोरीत पिण्याच्या पाण्यापासून इतर नागरी सुविधांसाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत झाल्याने तरी दिंडोरीचे भाग्य बदलावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.