पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मगितल्याप्रकरणी मागील आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत बदली करण्यात आली. टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने त्यांची बदली केल्याचा आरोप करत या निर्णयाच्या निषेधार्थ आज कोंढवा पोलीस स्टेशनवर शिवसेनेने मोर्चा काढला. तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून ज्योती चौक ते कोणार्क मॉल दरम्यान मोर्चा काढण्यात आला.

कोंढवा पोलीस स्टेशन येथे 14 महिन्यांपूर्वी मिलिंद गायकवाड हे रुजू झाले होते. कोंढवा पोलीस स्टेशन येथील सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होत नाही तोवर दोन दिवसांपूर्वी बदली करण्यात आल्याचा आदेश पोलीस विभागाकडून काढण्यात आला. त्यानंतर चार दिवसांपूर्वी मिलिंद गायकवाड यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांसह संवाद साधला आणि पदभार सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांमधील सहकारी कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून गायकवाड यांना देखील अश्रू अनावर झाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर आज राष्ट्रवादी, काँग्रेसकडून हडपसर विधानसभा अध्यक्ष नारायण लोणकर आणि शिवसेना पुणे शहरप्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.मिलिंद गायकवाड यांना न्याय मिळाला पाहिजे. योगेश टिळेकरांना अटक झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मिलिंद गायकवाड यांच्या पाठीशी अनेक संघटना एकत्रित आल्याने आता सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.