जागावाटपाबाबत पक्षांची प्राथमिक चर्चा; नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा आग्रह

पालघर : पुढील महिन्यात होणाऱ्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटपाच्या बाबतच्या चर्चेची प्राथमिक फेरी झाली आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असावा, असा आग्रह या पक्षाच्या प्रतिनिधींनी आघाडीच्या चर्चेदरम्यान पुढे आणला आहे. या प्रस्तावावर विचार करण्यास काँग्रेसने अवधी मागितला असून काँग्रेसची भूमिका ही आघाडीच्या बाबत निर्णायक ठरणार आहे.

पालघर नगर परिषदेमध्ये सध्या राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक तर काँग्रेसचा एक असे बलाबल असून नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात आघाडी करण्याच्या दृष्टीने प्राधिकृत केलेल्या सदस्यांची बैठक गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. महिलांसाठी राखीव नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे पुढे केली आहेत. सध्याचे नगर परिषदेमधील पक्षीय बलाबल पाहता आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असावा, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या चर्चेदरम्यान घेतली आहे.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या उमेदवाराकडे निवडून येण्याची क्षमता (इलेक्ट्रॉल मेरिट) अधिक असल्यास अशा उमेदवाराला राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवला आहे. याबाबत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचे निरीक्षक दोन मार्च रोजी पालघरच्या दौऱ्यावर येणार असून निरीक्षकांमार्फत आघाडी करण्याबाबतचा प्रस्तावावर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा विचार घेतला जाणार आहे. यामुळे या आघाडीसंदर्भात दोन मार्चनंतरच निर्णय होणे अपेक्षित आहे.

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात जागावाटपावरून प्राथमिक चर्चा पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आघाडीमध्ये सहभागी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला  १९ जागा तर बहुजन विकास आघाडी नऊ (९) जागा लढवेल, असा प्राथमिक निर्णय घेण्यात आला असल्याचे दोन्ही पक्षांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. पालघर नगर परिषदेमध्ये सत्तास्थानी असलेल्या शिवसेना पक्षाने शहराचा विकास अपेक्षित गतीने केला नसल्याने आरोप विरोधकांनी केला असून शिवसेना-भाजप युतीला पाडण्यासाठी तिन्ही पक्षांची आघाडी असणे आवश्यक असल्याचे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शिवसेना-भाजप यांच्यात युती होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत. २८ जागांपैकी भाजपने लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मिळालेल्या मतांचा दाखला देत भाजपने १४ जागांवर मागणी केली आहे, तरीही शिवसेनेतर्फे चार ते सहा जागा देण्यात याव्या, अशी प्राथमिक भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय होणे अपेक्षित असून स्थानिक शिवसेना व भाजप कार्यकर्ते पालघरची निवडणूक स्वबळावर लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.